Raigad Girl Injured In Mobile Blast: 'आमचा हा तर मोबाईल समोर असल्याशिवाय जेवतच नाही' किंवा 'अगं मला कळत नाही एवढा मोबाईल याला कळतो,' अशी वाक्य आपल्यापैकी अनेकांनी कधी ना कधी ओळखीतील व्यक्तींकडून घरातील लहान मुलांबद्दल बोलताना ऐकली असतील. घरोघरी मातीच्या चुली म्हणतात त्याप्रमाणे हल्ली लहान मुलांकडून मोबाईलचा वापर वाढल्याचं आणि त्यांना मोबाईलचं व्यसन लागल्याचं (Kids Mobile Addiction) चित्र पहायला मिळत आहे. मुलं रडू लागली, जेवण्याच्या वेळेस, घरी कोणी आल्यास मुलांची कटकट नको म्हणून अशा बऱ्याच कारणांसाठी त्यांच्या हातात मोबाईल देऊन त्यांना शांत केलं जातं. मात्र मोबाईल मुलांच्या हाती देताना पालकांकडून मुलांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचे प्रकार वाढताना दिसत आहेत. असाच एक प्रकार नुकताच रायगडमध्ये घडला. या अपघातामध्ये एक चिमुकली मुलगी मोबाईलचा स्फोट झाल्याने गंभीर जखमी झाली आहे. 


नेमकं घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समोर आलेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील अंबिवलीमध्ये ही घटना घडली. येथील 6 वर्षांची एक चिमुरडी मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट होऊन जखमी झाली आहे. अनिता वाघमारे असं या चिमुकलीचं नाव असल्याचे समजते. मोबाईल पाहत असतानाच अचानक त्याचा स्फोट झाल्याने अनिता गंभीर जखमी झाली आहे. अनिताच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली आहे. मोबाईलच्या स्फोटामध्ये अनिता जखमी झाल्यानंतर घरच्यांनी तिला तातडीने महाडच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलं. या ठिकाणी अनितावर प्राथमिक उपचार करण्यात आले.


उपचारांसाठी मुंबईला हलवलं


जखम गंभीर असल्याने अनिताला पुढील उपचारांसाठी दुसऱ्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं आहे. अनिताला पुढील उपचारांसाठी मुंबईमधील भायखळा येथील जे. जे. रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं आहे.


मुलांकडे लक्ष द्या


उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु असल्याने लहान मुलांचा मोबाईलाचा वापर हा सामान्यपेक्षा अधिक वाढला आहे. अनेकदा पालकांचं लक्ष नसतानाही लहान मुलं मोबाईल वेगवेगळा कंटेट पाहत असतात. मात्र बऱ्याच पालकांचं मुलं मोबाईलवर नेमकं काय करतात याकडे फारसं लक्ष नसतं. केवळ मोबाईल हातात देणे आणि नंतर तो काढून घेणे असाच वापर काही पालकांकडून केला जातो. त्यामुळेच मुलं मोबाईलवर अधिक अवलंबून राहू लागतात आणि त्यांना अगदीच लहान वयात मोबाईल पाहण्याची सवय लागते.



मुलांना मोबाईल देताना खाली गोष्टी लक्षात ठेवा


> मुलांचा हट्ट पुरवण्यासाठी मोबाईल हातात देऊ नका.


> मुलं मोबाईलमध्ये काय करतात यावर लक्ष ठेवणं आवश्यक.


> मोबाईलपेक्षा मुलांशी जास्त संवाद साधणे आवश्यक आहे.


> मोबाईल गेमऐवजी मैदानी खेळांची आवड लावणं गरजेचं आहे.


> चार्जिंग होताना मोबाईल मुलांकडे देऊ नका.