कपिल राऊत, झी २४ तास, ठाणे : गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्यांवरील घरांमध्ये तसेच खाडीकिनारी वसलेल्या अनधिकृत घरांमध्ये पाणी घुसून मोठ्या प्रमाणात हानी झाली. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदा पावसाळ्यात ठाणे शहर आणि दिवा-मुंब्रा परिसरातील नाल्यांवर, खाडी किनारी भराव टाकून बांधण्यात आलेल्या घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेक कुटुंबांना स्थलांतरित करावं लागलं होतं. यामुळे नाल्यावरील आणि खाडी किनारी दोन्ही बाजूला ३ मीटर अंतरामध्ये असलेली बांधकामे पावसाळ्यानंतर निष्काषित करण्याचे आदेश जयस्वाल यांनी दिले आहेत. तसंच या अनधिकृत बांधकामांसाठी टाकण्यात आलेला भराव काढून शहरातील खाडी किनारी खाडी पूर्ववत करण्याच्या आणि त्या ठिकाणी खारफुटीची लागवड करण्याच्या सूचनाही पालिका आयुक्तांनी दिल्यात.



तर शहरात पाणी साचून त्याची झळ बसलेल्या ठाणेकरांनीही पालिकेच्या निर्णयाचं स्वागत केलंय. २६ जुलै २००५ ला मुंबईची जी दैना झाली ती ठाण्याची होऊ नये त्यासाठी पालिकेने उचलेलं पाऊल महत्त्वाचं आहे. आता त्याची अंमलबजावणी ही तितकीच परिणामकारकपणे व्हावी ही अपेक्षा...