जळगाव, मनमाडमध्ये पावसाची जोरदार हजेरी
पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील काही भागात जोरदार पावसानं हजेरी लावली. जळगावपासून काही अंतरावर असलेल्या पाळधी गावात पावसामुळे काही वेळ पुरपरिस्थिती निर्माण झाली. पाळधी ग्रामपंचायत चौकात अनेक दुकानांना पुराच्या पाण्याचा वेढा बसला. यात फारसं नुकसान झालं नसलं तरी अचानक आलेल्या पुरामुळं गावकऱ्यांना वाहने तसंच पाण्यातून मार्ग काढणं अवघड झालं होतं, जळगाव शहरातही दुपारी अडीच ते चार वाजेदरम्यान मध्यम पावसानं हजेरी लावली. एकंदरीत दडी मारलेला पाऊस पुन्हा परतल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून खरिपाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
पाणी टंचाईसाठी देशभरात कुप्रसिद्ध असलेल्या मनमाड शहर परिसरात सलग तिसऱ्या दिवशी पावसानं झोडपून काढल्यानं काही अंशी पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. शहरात पावसाची मुसळधार सुरूवात झाली आहे. त्यामुळे शहरातील विविध भागात पाणी साचलयं, तर शहरातून वाहणाऱ्या रामगुळणा आणि पांझण नदीतून पाणी वाहतयं. त्यामुळे पाणी टंचाईने त्रस्त असलेल्या मनमाडकरांना दिलासा मिळाला आहे.