अरूण मेहेत्रे, झी मीडिया पुणे : पुण्यात आज परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ उडवून दिला. पुण्यात दुपारच्या वेळी अवघ्या तासाभरात झालेल्या पावसाने पुणेकरांच्या तोंडचं पाणी पळवलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंधारून आलेल्या रस्त्यावर साचलेल्या पाण्यात अक्षरशः तरंगणाऱ्या गाड्या... दुपारच्या वेळी अचानक दाटून आलेला अंधार आणि मुसळधार पाऊस... रस्त्यात साचलेल्या पाण्यातून वाट काढणाऱ्या दुचाकी आणि चार चाकी... अनेक वस्त्यांत रस्त्यावर उन्मळून पडलेली मोठी झाडं....


पावसानंतर निर्माण झालेली ही दृष्य आहेत पुण्यातली... परतीच्या पावसाने पुण्यात दुपारच्या वेळेत अक्षरशः धुमाकूळ घातला. वादळी वारा आणि वीजांच्या कडकडाटासह अवघ्या एका तासात 88.6 मिलीमीटर पाऊस पुण्यात पडला. त्यामुळे पुण्यात पूरस्थिती निर्माण झाली. या मोसमातला सर्वात मोठा पाऊस पुण्यात अवघ्या तासाभरात पडला. पावसाचं हे रौद्ररूप पाहून पुणेकरही हादरून गेले. 


या पावसामुळे रस्त्यात पाणी साचलं यात शंकाच नाही... पण रस्त्यात पाणी साचण्यासाठी एकटा पाऊस कारणीभूत नाही. मनपाचा भोंगळ कारभारही त्याला तेवढाच कारणीभूत आहे असा आरोप पुणेकरांनी केलाय. वेड्यावाकड्या पद्धतीने बांधलेल्या इमारती, त्यांना मनपाने आंधळेपणाने दिलेल्या परवानग्या... ओढ्या नाल्यांवर झालेलं अतिक्रमण... यामुळे पाणी वाहून जाण्यास मार्गच नाही. त्यामुळे मोठ्या पावसाने पुणेकरांची दैना उडाल्याचा आरोप करण्यात येतोय. 


88.6 मिलीमीटर पावसाने पुणेकरांची गाळण उडवलीच. पण महापालिकेच्या कामगिरीचेही वाभाडे काढलेत. संपूर्ण मोसमातलं परतीच्या पावसाने दाखवलेलं तासाभराचं हे तांडव पुण्याच्या नेहमी लक्षात राहील...