Monsoon Updates : पुढचे 5 दिवस राज्यात मुसळधार; लोणावळ्यात जायचा बेत आखणाऱ्यांसाठी मोठी बातमी
शेतीची कामं मार्गी लावण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या बळीराजासाठी ही सर्वात महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी
Monsoon Updates : मागील आठवड्यामध्ये जोरदार बरसलेल्या पावसानं शनिवारी कुठे दडीच मारली. रविवारी हा मान्सून पुन्हा सक्रिय झाला आणि नव्या आठवड्याचं स्वागतचही त्यानं मुसळधार सरींनीच केलं. सोमवारी सकाळपासूनच राज्यावर पावसाच्या काळ्या ढगांची चादर पाहायला मिळाली. (Rain Picnic Monsoon updates Lonavala mumbai pune trip)
भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील 5 दिवस मान्सून सक्रिय राहणार आहे. मंगळवारी म्हणजेच 5 जुलैपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे.
शेतीची कामं मार्गी लावण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या बळीराजासाठी ही सर्वात महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी. तर, फिरस्त्यांसाठीही ही आनंदाची बातमी.
जुलै महिना उजाडल्यानंतर सर्वांनाच चांगल्या पावसाची अपेक्षा असते. कारण, प्रत्येकाला धकाधकीच्या आयुष्यातून काहीशी उसंत काढ कुठेतरी सहलीला जायचं असतं. याच गरजेतून आपल्यानजीकच्या ठिकाणांची नावं पुढे येतात आणि त्यातून अनेकांची पसंती मिळते ती म्हणजे लोणावळ्याला.
मुंबई, पालघर, पुणे, अलिबाग अशा बऱ्याच ठिकाणहून असंख्य पर्यटक पावसाच्या दिवसांमध्ये लोणावळ्यात गर्दी करतात. नुकत्याच मागे पडलेल्या शनिवार- रविवारीही या भागात अशीच गर्दी पाहायला मिळाली. ज्यामुळं इथं काही भागात वाहतूक कोंडीही झाली.
पोलिसांची करडी नजर
पावसाळ्यात लोणावळ्याला येणाऱ्यांमध्ये काही बेजबाबदार आणि हुल्लडबाजांचाही समावेश असतो. अशा पर्यटकांवर यावेळी पोलिसांची करडी नजर असणार आहे. यासाठी लोणावळा पर्यटन क्षेत्रात चेक पोस्ट लावण्यात आले आहेत. खंडाळा, कुमार चौक, भुशी डॅम आणि टायगर पॉईंट या ठिकाणी पोलिसांच्या चौक्या तयार करण्यात आल्या आहेत. दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांवरही पोलीस नजर ठेवून आहेत.
तेव्हा लोणावळ्याला पावसाच्या या मोसमाचा आनंद घेण्यासाठी जाण्याचा बेत तुम्ही आखत असाल, तर तिथे फक्त निसर्गाचा आनंद घ्या. कारण कोणताही चुकीचा प्रकार घडल्यास तुमच्यावर कठोर कारवाई केली जाऊ शकते.