तापमान ४८ अंशावर गेलेल्या चंद्रपुरात ढगांच्या कडकडाटासह पाऊस
पावसाच्या सरी कोसळल्याने चंद्रपुरकरांना दिलासा
आशीष अम्बाडे, झी 24 तास, चंद्रपूर : तापमान 48 डिग्रीवर पोहोचलेल्या चंद्रपुरात पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. शहरवासियांना यामुळे दिलासा मिळाला आहे. सोसाट्याचा वारा आणि ढगांचा गडगडाट, अचानक बदलले वातावरण, काळे ढग यामुळे वातावरणात गारवा आला आहे. वातावरण थंड झाल्याने नागरिकांना थोडा का होईना दिलासा मिळाला आहे. मान्सूनपूर्व पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह येथे पाऊस झाला आहे.
48 डिग्री तापमान सहन केलेल्या चंद्रपुरात आज अचानक पावसाच्या सरी बरसल्या. दुपारभर शहरवासियांनी उन्हाचा तडाखा अनुभवला. संध्याकाळच्या सुमारास सोसाट्याचा वारा आणि ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि अचानक वातावरण बदलले. काळ्या ढगांची आकाशात दाटी झाली आणि 4 महिने प्रतीक्षा असलेल्या टपो-या थेंबानी फेर धरला. वातावरणात सुखद बदल झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.
साधारण अर्धा तास वरुणराजाने हलक्या सरींची बरसात केली. मान्सूनपूर्व पाऊस आणि विजांच्या कडकडाटाने उत्तम सरी बरसण्याची आशा पल्लवित झाली आहे. या पावसाने वातावरण आल्हाददायक झाले आहे. आकाश अजूनही काळ्या मेघांनी भरून असल्याने पाऊस आणखी बरसेल असा अंदाज आहे.