पुणे : पावसाने हाहाकार उडवून दिला. तीन तासांत ११२ मिलीमीटर एवढा धो धो पाऊस कोसळला. मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुराने पुणे जिल्ह्यात १३ जणांचे बळी घेतले आहेत. अनेक जनावरंही मृत्यूमुखी पडली आहेत. घरांची पडझड झाली असून चारचाकी आणि दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. महापुराने पुणेकरांची दैना उडवून दिली आहे.पावसामुळे अरण्येश्वर परिसरातून जाणाऱ्या आंबील नाल्यानं रौद्रवतार घेतला. नाल्याचं पाणी टांगेवाला कॉलनीत शिरल्यानं एका घराची भिंत कोसळली. यात पाच जण ठार झाले आहेत. चार जणांचे मृतदेह सापडले आहेत. अजूनही एकाचा शोध एनडीआरएफचे पथक घेत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अवघ्या तीन तासांमध्ये पडलेल्या पावसानं पुण्यातल्या वाहनांचे अतोनात नुकसान झाले. अनेक सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी शिरले. पाण्याच्या प्रवाहामध्ये गाड्या वाहून गेल्यात. पद्मावती भागातलीट्रेजर पार्क इमारत. रात्रीच्या मुसळधार पावसाने नाला ओसंडून वाहू लागला आणि या उच्चभ्रू सोसायटीची संरक्षक भिंत कोसळली. 


पुराचं पाणी इमारतीत शिरलं आणि बेसमेंटमध्ये असलेले पार्किंग पाण्यानं संपूर्ण भरले. रात्रीची वेळ असल्यानं बहुतांश गाड्या पार्किंगमध्येच होत्या. सुमारे साडेतीनशे कार आणि तेवढ्याच बाईक काही तास तब्बल ३ मीटर पाण्याखाली होत्या. सकाळी अक्षरशः पंप लावून पाणी बाहेर काढण्याचे काम सुरू झाले. पण समस्या इथंच संपणार नाही. या गाड्यांच्या इंजिनमध्ये आता चिखलाचा खच जमा झाल्याने नागरिकांना आता चिंता वाढली आहे.


तसेच स्प्रिंग फिल्ड सोसायटीमध्येही काहीशी अशीच स्थिती आहे. तिथंही पार्किंगमध्ये असलेल्या सुमारे १०० गाड्यांचं नुकसान झाले आहे. हे झालं सोसायट्यांमध्ये पार्क केलेल्या गाड्यांचं. पण पुण्यामध्ये रस्त्या-रस्त्यावर गाड्या पार्क केल्या जातात. पुराच्या पाण्याने या गाड्यांची अतोनात हानी झाली आहे. अक्षरशः हजारो गाड्या वाहून गेल्या आहेत. एकमेकींवर आदळल्याने त्यांचं प्रचंड नुकसान झाले आहे. इंजिनांमध्ये चिखल शिरला आहे.
 
विविध ठिकाणी अडकून पडलेल्या गाड्या बाहेर काढणे हे आता प्रशासनासमोर आणि नागरिकांसमोरचं मोठे आव्हान असणार आहे. दुचाकींच्या संख्येत पुण्याचा देशात तिसरा क्रमांक लागतो. तर एकूण वाहनांच्या संख्येत सहावा. एवढ्या मोठ्या संख्येनं वाहने असताना अशी एखादी घटना घडली तर आपल्या यंत्रणा किती तोकड्या आहेत, हेच बुधवारच्या पुरानं दाखवून दिले आहे.