शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील औराद शहाजनीमध्ये काल सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत मुसळधार पाऊस झाला. पावसाचं पाणी लातूर-बिदर मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या अनेक दुकानात शिरलं. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लातूर-जहिराबाद या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण आणि मजबुतीकरणाचे काम गेल्या अडीच वर्षांपासून कासव गतीने सुरु आहे. त्यामुळे रस्त्यातील खोदकामामुळे या मार्गावर अपघात ही नित्याचीच बाब झाली आहे. त्यात पाऊस पडला की वाहनधारकांना चिखलात मार्ग शोधावा लागतो. संबंधित कंत्राटदार याला जबाबदार असून प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करावी आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे.


विशेष बाब म्हणजे लातूर ते कर्नाटकातील जहिराबाद या राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला असलेल्या नाल्यांचे काम अर्धवट असल्यामुळे गावातील पावसाच्या पाणी जाण्यास मार्गच उरला नाही. त्यामुळेच हे पाणी महामार्गशेजारी असलेल्या अनेक दुकानात शिरले. अनेक दुकानात चार ते पाच फुट तर काही दुकानात गुडघाभर पाणी होतं. 


जर वेळीच महामार्गाशेजारील बाजारपेठेतील सांडपाण्याला संबंधित कंत्राटदाराने अगोदरच नालीवाटे वाट मोकळी केली असती, तर अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरुन नुकसान झालं नसतं, अशी व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदार याला जबाबदार असून प्रशासनाने त्याच्यावर कारवाई करून नुकसान भरपाई देण्याची मागणी दुकानदार, व्यापारी करु लागले आहेत.