`पवार साहेबांचा पक्ष चोरून अजितदादांची..`, `सुपारीबाज`वरुन मनसे आक्रमक; `पावसाळी बेडूक` म्हणत टीका
Raj Thackeray MNS vs Ajit Pawar Group: पुण्यात आलेला पूर आणि त्यानंतर झालेली शहराची अवस्था यावरुन टीका करताना वापरल्या गेलेल्या शब्दांवरुन दोन्ही पक्ष आमने-सामने आलेत.
Raj Thackeray MNS vs Ajit Pawar Group: पुण्यातील दौऱ्यामध्ये राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवरुन अजित पवार गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये चांगलीच जुंपली आहे. पूरग्रस्तांच्या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना राज ठाकरेंनी, उपमुख्यमंत्री पुण्यात नसतानाही धरण वाहिलं, इतकं पाणी पडलं असा टोला लगावल्यानंतर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी राज ठाकरेंना सुपारी सुपारीबहाद्दर म्हटलं. आता या टीकेला मनसेनं थेट अजित पवारांची एक खासदार निवडून आणताना दमछाक झाली. शरद पवारांचा पक्ष तुम्ही चोरला आहे, अशी टोकाची टीका केली आहे. तसेच अमोल मिटकरींवरही निशाणा साधताना त्यांचा उल्लेख 'टी-शर्टवर पेन लावणारा पावसाळी बेडूक' असा केला आहे.
राज काय म्हणालेले?
"पाऊस पडणं आपल्या हातात नाही. पण असा पाऊस पडल्यानतंर दरवाजे उघडले जातील त्याचा लोकांना त्रास होणार नाही याचं कोणतं प्लॅनिग केलं आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत. एक तर पुण्याचे आहेत. ते नसतानाही धरण वाहिलं, इतकं पाणी पडलं. त्यांनी यात लक्ष घालायला नको का?" असा खोचक टोला राज ठाकरेंनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना लगावला. "नदी जाणारं जगातील हे एकमेव शहर नाही. तिथे ज्या गोष्टी होतात त्या आपल्याकडे का होत नाही. इलेक्ट्रिकच्या पोलला दिवे लावण्याचे उद्योग करण्यापेक्षा यावर बोललं पाहिजे," असा संताप राज यांनी पुण्यातील पुराबद्दल बोलताना व्यक्त केलेला.
अजित पवार गट राज ठाकरेंना म्हणाला सुपारीबहाद्दर
अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी राज ठाकरेंच्या टीकेवर प्रतिक्रिया नोंदवताना थेट राज ठाकरेंना लक्ष्य केलं. "दिलेला शब्द पाळणाऱ्या अजित पवारांबद्दल सुपारीबहाद्दरांनी बोलू नये. कारण या सुपारीबहाद्दरांचं टोलनाक्याचं, भोंग्याचं किंवा इतर कोणतंही आंदोलन यशस्वी झालं नाही. या व्यक्तीची विश्वासार्हता संपली आहे. महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तीने अजित पवारांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखं आहे," अशी टीका अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर केली. "सुपारीबहाद्दर नेत्यांकडून जनतेने योग्य तो धडा घेतला आहे. नव्या नवरीचे नऊ दिवस म्हणून पुण्यात भेट द्यायची. ज्या व्यक्तीला एनडीआरएफचा लाँग फॉर्म माहित नाही, तो माणूस आज आपत्ती व्यवस्थापनावर बोलतो हा अलीकडच्या काळातील राजकारणातील सर्वात मोठा जोक आहे," अशी खिल्लीही अमोल मिटकरींनी उडवली.
अजित पवारांच्या घरातले दोन सदस्य पराभूत झालेत
मनसेचे नेते गजानन काळे यांनी आता अमोल मिटकरींच्या टीकेवरुन अजित पवार गटावर कठोर शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. "70 हजार कोटींचा घोटाळा करून नुसते पान सुपारी नाही तर महाराष्ट्राला चुना लावला अजित दादांनी (हे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.) तरी घासलेट चोर वर तोंड करून आम्हाला सुपारीबाज बोलतोय. अजितदादांच्या घरातल्या सदस्यांना एकदा नव्हे तर दोनदा निवडणुकीत पराभूत व्हावे लागले आणि कसल्या राज ठाकरे यांच्या यश अपयशाच्या बाता मारतो रे घासलेट चोर? "हिम्मत असेल तर स्वतःचा पक्ष काढून 2 आमदार निवडून आणावेत तुमच्या दादांनी, मग जाहीर मिशी कापून तुझ्या हातात देवू," असा टोला गजानन काळेंनी अमोल मिटरकरींच्या टीकेवरुन लागवला आहे.
शरद पवारांचा पक्ष चोरल्याचा मनसेचा टोला
शरद पवारांचा पक्ष चोरुन अजितदादांची एक खासदार निवडून आणताना दमछाक झाल्याचा टोलाही गजानन काळेंनी लगावला आहे. "उगाच पवार साहेबांचा पक्ष चोरून रेघोट्या मारू नका. पक्ष चोरून पण 1 खासदार निवडून आणताना दमछाक झाली तुमच्या दादांची. (ते सुनील तटकरे पण स्वतःच्या हिम्मतीवर आले)" असंही काळेंनी म्हटलं आहे. तसेच अमोल मिटकरींवर टीका करताना, "टी-शर्टवर पेन लावणारा पावसाळी बेडूक मटणकरी कुठला. आम्हाला शिकवायचं नाय, लायकीत राहायचं, लायकीत," असंही गजानन काळेंनी म्हटलं आहे.
आता यावर अमोल मिटकरी काय बोलणार हे पहावं लागणार आहे.