राज ठाकरेंची `मनसे` घे भरारी! ठाकरे गट आणि भाजप दोघांना एकाच वेळी टक्कर देणार
ठाकरे गट आणि भाजप या दोघांना टक्कर देण्यासाठी राज ठाकरेंच्या मनसेने देखील मास्टरप्लान बनवला
मुंबई : मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. शिंदे गट आणि भाजप यांनी निवडणुका एकत्र लढण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मुंबई महापालिकेवर सध्या ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता आहे. मात्र, ही सत्ता खेचून आणण्याचा पणच भाजप नेत्यांनी केला आहे. यामुळेच ठाकरे गट आणि भाजप यांनी सर्व तयारी निशी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरु केली आहे. त्यातच आता ठाकरे गट आणि भाजप या दोघांना टक्कर देण्यासाठी राज ठाकरेंच्या मनसेने देखील मास्टरप्लान बनवला आहे. 'घे भरारी' अभियानाच्या माध्यमातून मनसे थेट ठाकरे गट आणि भाजपला चॅलेंज करणार आहे.
मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेना घे भरारी अभियान राबवणारेय. शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रा आणि भाजपच्या जागर यात्रेला मनसे घे भरारी अभियानानं उत्तर देण्यासाठी मैदानात उतरणारेय. मुंबईच्या प्रत्येक विभागात घे भरारी अभियान राबवण्यात येईल. या अभियानावर मुंबईतील सर्व विभाग अध्यक्षांची बैठक घेण्यात आली. लवकरच या अभियानाची सुरुवात होणारेय.
मनसेचा स्वबळाचा नारा
मागील काही दिवसात राज ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढली होती. यामुळे राज ठाकरे शिंदे गट किंवा भाजपसोबत जाऊ शकतात अशी चर्चा रंगली होती. मात्र, राज ठाकरे यांनी मनसे स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर करत मनसे भाजप तसेच मनसे शिंदे गट यांच्या युतीच्या चर्चेला पूर्णविराम दिला. आता मनसे प्रत्यक्षात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.
भाजपची भूमिका
भाजप नेत्यांनी मुंबई महापालिका जिंकण्याचा पणच केला आहे. मुंबई दौऱ्यावेळी केद्रीय मंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शहा यांनी देखील भाजप नेत्यांना मुंबई महापालिकेवर सत्ता आणण्यासाठी सूचना केल्या होत्या. भाजपच्या सर्व बड्या नेत्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरु केली आहे.
सत्ता टिकवण्याचे ठाकरे गटाची धडपड
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्ष फुटला. याचा जबरदस्त फटका उद्धव ठाकरेंना बसला आहे. शिंदे गटाला पाठिंबा वाढत आहे. यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे स्वत: मैदानात उतरले असून अख्खा महाराष्ट्र ते पिंजून काढत आहेत. मात्र, मुंबई महापालिकेवरील सत्ता कायम टिकवण्याचे मोठे शिवधनुष्य त्यांना पेलवायचे आहे. मुंबई महापालिकेतील अनेक नगरसेवकांवर भष्ट्राचाराचे आरोप झालेत. तसेच या आरोपांचे धागेदोरे थेट मातोश्रीपर्यंत पोहचले आहेत. यामुळे ठाकरे गटाला येत्या निवडणुकीत पुन्हा सत्ता खेचून आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार हे निश्चित. मात्र, मुंबईकर कोणाला कौल देतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.