अमित ठाकरेंविरोधात शिवसेनेने दिला तगडा उमेदवार; माहीमची जागा अटीतटीची ठरणार, काय आहेत समीकरणं?
Sada Sarvankar Vs Amit Thackeray: शिंदेच्या शिवसेना पक्षाची 45 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. यात अनेक विद्यमान आमदारांचा समावेश आहे.
Sada Sarvankar Vs Amit Thackeray: महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. भाजपने 99 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यानंतर आता महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेही पहिली यादी जाहीर केली आहे. शिंदेंच्या शिवसेना पक्षाच्या पहिल्या यादीत 45 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहे. यात अनेक विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. माहिममधून शिवसेनेने विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना तिकिट देण्यात आलं आहे. तर, राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेदेखील या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळं ही निवडणुक अटी-तटीची ठरणार आहे.
अमित ठाकरे यांच्या रुपाने आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. मनसेने मंगळवारी 45 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर काही वेळातच शिवसेनेकडूनही उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना तिकिट देण्यात आलं आहे. तर, अमित ठाकरे हे देखील माहिम मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळं माहिम मतदारसंघात संघर्षाची लढाई होणार असल्याचे स्पष्ट दिसतंय.
2019 साली आदित्य ठाकरे जेव्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते तेव्हा राज ठाकरेंनी आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार दिला नव्हता. त्यामुळं आता उद्धव ठाकरे माहिममध्ये उमेदवार देणार का? असा सवाल चर्चेत आहे. मात्र शिंदे गटाचा उमेदवार रिंगणात असताना अमित ठाकरेंसाठी ही लढाई सोप्पी नसणार. तसंच, उद्धव ठाकरेंनीही या मतदारसंघात उमेदवार दिला तर तिरंगी लढत होणार, हे तर स्पष्ट आहे.
माहिम मतदारसंघात 45 हजारांच्या आसपास मराठी, 33 हजारांच्या जवळपास मुस्लिम आणि 9 हजारांच्या आसपास ख्रिश्चन मतं आहेत. 2019 साली सदा सरवणतर हे माहिम मतदारसंघातून विजयी झाले होते. तेव्हा त्यांच्या विरोधात मनसेचे संदीप देशपांडे आणि काँग्रेसचे प्रविण नाईक होते. या लढतीत मनसेचे संदीप देशपांडे दुसऱ्या क्रमांकावर होते.
2014सालीदेखील सदा सरवणकर यांचा विजय झाला होता. तर, 2009 साली माहिममधून नितीन सरदेसाई विजयी झाले होते. माहिममधून नितीन सरदेसाई यांना 48,734 मतं मिळाली होती. तर काँग्रेसकडून निवडणुक लढवलेल्या सदा सरवणकर यांना 39,808 मतं मिळाली होती.