चंद्रशेखर भुयार / उल्हासनगर : गेल्या काही वर्षांपासून हॉटेल आणि ढाब्यांवर आमदार, खासदार यांच्या नावाने खवैय्यांना जम्बो महाथाळी (Jumbo Thali) उपलब्ध करून दिली जात आहे. सहकुटुंब अथवा मित्र मंडळींसह जेवायला येणारे या महाथाळीला पसंती देऊ लागले आहेत. अशीच एक जम्बो थाळी उल्हासनगरमधील ( Ulhasnagar) मिट अँन्ड इट या हॉटेलने अलि़कडेच उपलब्ध करून दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवजयंतीचं औचित्य साधून सुरू करण्यात आलेल्या या राजभोग महाराजा थाळीचे (Rajbhog Maharaja Jumbo Thali)  वैशिष्ट्य म्हणजे त्यात विविध प्रकारचे ३५ पदार्थ आहेत. एरव्ही तर ही एक थाळी सहजपणे चार-पाच माणसांना जेवणासाठी पुरते. मात्र एवढे पदार्थ ४५ मिनिटात एकट्याने खाऊन दाखवले तर त्याला एक तोळा सोने देण्याची घोषणा हॉटेल व्यवस्थापनाने जाहीर केली आहे. 


काय-काय आहे थाळीत ? 


चिकन, मटण, सात प्रकारचे मासे आणि अंड्यांचा समावेश आहे. चिकन आणि मटन बिर्याणीसह चार प्रकारचे भात, पापलेट, सुरमई, बांगडा, बोंबिल आदी सात प्रकारचे मासे, अंडी, चिकन लॉलीपॉप अशा सर्व मांसाहारी पदार्थांचा या थाळीत समावेश आहे. त्याशिवाय चार प्रकारचे पापड, सोलकढी, ताक, रोटी, भाकरी, घावणे, तंदुरी आदी प्रकार या थाळीत असतात. 


उल्हासनगर कॅम्प नंबर ४ मधील या हॉटेलमधील राजभोग थाळीचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे इथे मालवणी, कोल्हापुरी, आगरी, घाटी अशा विविध प्रांतातील मसाल्यांचा वापर केलेले पदार्थ एकत्र चाखायला मिळतात. थाळी हवी असेल तर दोन तास आधी ऑर्डर द्यावी लागते. नवनाथ झोटिंग आणि रेश्मा झोटिंग दाम्पत्य हॉटेलचे व्यवस्थापन पाहतात. गेल्या वर्षी २६ जानेवारीला त्यांनी हे हॉटेल सुरू केले. परंतु कोरोना काळात ते बंद करावे लागले. त्यानंतर नव्याने खवैय्यांच्या सेवेत येताना त्यांनी या जम्बो थाळीवर  बक्षिसही तसं साजेसं ठेवलंय. काहीजण बक्षिस जिंकण्याचा प्रयत्नही करतायेत. कोण खवय्या ही बाजी मारतोय त्याची उत्सुकता आहे.