Maharastra Politics : `...तर मी राजकीय संन्यास घेईल`, दरेकरांच्या आरोपावर राजेश टोपे स्पष्टच म्हणाले...
Praveen Darekar allegation : दरेकर यांनी याप्रकरणी शरद पवार यांचंच नाव घेतलं नाही, तर माजी मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांचेही नाव घेतलं.
Rajesh Tope On Pravin Darekar Allegation : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या आंदोलनामागे शरद पवार यांचा हात आहे. आंदोलन काळात केवळ शरद पवारच जरांगेंना फोन करत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या विषयी शिवराळ भाषा वापरणाऱ्या जरांगेविरोधात गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी, अशी मागणी प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी केली आहे. राज्यामध्ये जर कायदा सुव्यवस्थेला धोका पोहोचवायचा प्रयत्न होत असेल तर ते कोणीही असो त्याचे प्लॅनिंग करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन एसआयटीमार्फत (SIT) चौकशी झाली पाहिजे, असंही दरेकर म्हणाले आहेत. दरेकर यांनी याप्रकरणी शरद पवार यांचंच नाव घेतलं नाही, तर माजी मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांचेही नाव घेतलं.
मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीमध्ये दंगल का घडवली? सरकारने याचा शोध घेतला पाहिजे. राजेश टोपे यांच्या कारखान्यावर सर्वकाही षडयंत्र रचलं गेलं होतं. त्यावेळी राजेश टोपे यांच्या कारखान्याची गाडी वापरली गेली. त्यामुळे या प्रकरणात रोहित पवार आणि राजेश टोपे यांची एसआयटी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी प्रविण दरेकर यांनी केली होती. त्यावर आता राजेश टोपे यांनी रोखठोक उत्तर दिलंय.
काय म्हणाले राजेश टोपे?
मी यानिमित्ताने सांगेन मराठा आरक्षणाचा लढा हा मराठा मुलांच्या न्याय हक्कासाठी आहे. गरीब मराठा समाजाचे भले व्हावे हाच उद्देश आहे. जरांगे पाटील यांची देखील हीच भूमिका आहे. मी जेव्हा जालना जिल्ह्याचा पालकमंत्री होतो त्यावेळेस देखील त्यांनी मोठे आंदोलन केलं होतं. तत्कालीन मुख्यमंत्र्यांना जरांगेंनी मागण्याकरता भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि वर्षावर त्यांची भेट झाली होती. त्यांचा कोणत्याही पक्षाशी संबंध नाहीये. मनोज जरांगे पाटल्यांच्या मागे आम्ही अजिबात नाही. राजेश टोपेंचा डीएनए काय आहे? सर्वांना समवेत घेवून काम करणं. आम्ही जातीवादी काम करत नाही. आज संशय घेतला असेल तो धादांत खोटे आहेत, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
प्रविण दरेकरांच्या आरोपात सत्यता नाही. या आंदोलनला डायव्हर्ट करण्याचे काम कोणी करु नये. जरांगेच्या आंदोलनाला आम्ही पण सामोरे गेलोय. जर चौकशीला बोलावलं तर मी जाणार, माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असं स्पष्ट विधान राजेश टोपे यांनी केलं आहे. माझ्या कारखान्यात अनेकजण राहतात मुख्यमंत्र्यांचे हेलिकॅाप्टर तिथं उतरले होते मग काय म्हणायचे? असा सवाल देखील त्यांनी विचारला. अनेक लोक माहिती नसताना बोलतात. सर्व रेकॅार्ड निश्चित समोर आणावेत. मी एक टक्के जरी काही चुकीचे केलेले असेल तर मी राजकीय संन्यास घेईन, असं वक्तव्य राजेश टोपे यांनी केलं आहे.