लग्नमंडपात घुसून धुमाकूळ राजकुमार वाघाची गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयातही मस्ती सुरूच
Rajkumar Tiger : तीन वर्षापूर्वी थेट लग्नमंडपात प्रवेश करुन धुमाकूळ घालणाऱ्या राजकुमार वाघाला जेरबंद करण्यात आले होते. मात्र त्याच्या वर्तणुकीमुळे त्याला पुन्हा बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात सोडण्याता आले आहे.
अमर काणे, झी मीडिया, नागपूर : थेट लग्नमंडपात प्रवेश करून धुमाकूळ घालण्याचा इतिहास असलेला राजकुमार वाघाचं वास्तव्य सध्या बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात (Balasaheb Thackeray Gorewada International Zoological Park) आहे. पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेला राजकुमार वाघाचा स्वभाव मात्र अजूनही तेवढ्याच बिनधास्त आणि निर्धास्त असल्याचे पाहायला मिळत आहे. आपल्या भागामध्ये कोणतीही नवी गोष्ट दिसली तर स्वभावानुसार राजकुमार त्या गोष्टीची चाचपणी आणि पडताळणी करतोच. याचा प्रत्यय देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या लक्ष वेधून घेत आहे...
विदर्भात उष्णतेची तीव्रता सर्वाधिक असते. माणसांप्रमाणे मुकी जनावरेदेखील यातून सुटत नाहीत. त्यामुळे उष्णतेच्या झळा कमी करण्यासाठी प्राणीसंग्रहालयामध्ये विशेष व्यवस्था करण्यात येते. अनेक प्राणी संग्रहालयांमध्ये वन्य प्राण्यांकरता कुलर आणि त्यांचा उन्हाळ्यातील जेवणही बदलण्यात येते. नागपुरातील गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयातही या दोन गोष्टींबरोबर प्राण्यांकरता खास मिस्ट फॉगरही बसवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयातही वाघांसाठी खास मिस्ट फॉगर बसवण्यात बसवण्यात आले आहेत. मात्र तिथे असलेल्या राजकुमार वाघाने त्याच्या परिक्षेत्रात लावलेली ही नवी गोष्ट पचनी पडली नाही. त्याने मिस्ट फॉगरची पूर्ण यंत्रणा पाइपसह उखडून काढली आहे. त्यानंतर पुन्हा शेजारील पाण्यात डुंबून बसल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
महत्त्वाचं म्हणजे राजकुमार मुक्त असताना त्यानं तुमसर परिसरात लग्न समारंभात जाऊन धुमाकूळ घातला होता...आता राजकुमार वाघ गोरेवाडा प्राणी संग्रहालयातही आपल्या त्याच बिनधास्त वृत्ती वारंवार दाखवून देतो आहे.
2017 मध्ये राजकुमार वाघाने भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील एका लग्नमंडपात प्रवेश करुन दहशत माजवली होती. त्यावेळी राजकुमारने कुणालाही जखमी केले नव्हते. मात्र लग्नमंडपात अचानक राजकुमारने अचानक प्रवेश केल्याने परिसरात दहशत निर्माण झाली होती. त्यानंतर राजकुमारला जेरबंद करुन गोरेवाड्यातील वन्यप्राणी बचाव केंद्रात आणण्यात आले होते. तीन वर्षे तो या केंद्रात होता. केंद्रातच या वाघाची वर्तणूक खूपच चांगली होती. तीन वर्षे त्याच्या वर्तणूकीतून कुठेही हिंस्त्रपणा दिसून आला नाही. त्यामुळे त्याला बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात सोडण्यात आले होते.