सांगली : इस्लामपुरात आमचे कार्यालय फोडणारे कोण आहेत, हे सर्वश्रुत आहे.  बलात्कार, खंडणी आणि खुनाचे गुन्हे दाखल झालेले गुन्हेगार आमच्यावर हल्ले करीत आहेत.  ते कोणत्या पक्षात आणि कोणत्या संघटनेत आहेत, त्यांचे कारनामे काय आहेत, हे जगजाहीर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मला फार बोलायला लावू नका, नाहीतर मी सर्व भानगडी पुराव्यासह उघड करीन, त्यावेळी तुम्हाला पळता भुई थोडी होईल, असा जोरदार हल्ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि खासदार राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोतांवर चढवला. 


आज सांगली येथे जिल्हा परिषदेत कार्यक्रमास आले असता शेट्टी पत्रकारांशी बोलत होते.


धोरणाच्या विरोधात


शनिवारी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या ताफ्यावर झालेली दगडफेक आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून रयत क्रांती संघटनेने स्वाभिमानी संघटनेच्या कार्यालयावर हल्ला केला. त्या पार्श्‍वभूमीवर आज शेट्टी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटना व्यक्ती द्वेषातून आंदोलन करत नाही.


आमचे आंदोलन सरकारच्या धोरणाच्या विरोधात आहे. शेतकर्‍यांच्या रोषाला एकाच मंत्र्याला सामोरे जावे लागले असे नाही, येथून पुढे मंत्रीमंडळातील प्रत्येक मंत्र्याला शेतकर्‍यांचा आक्रोश व राग सहन करावा लागेल.


द्वेषातून आंदोलन नाही 


शेतकर्‍यांच्या मनात यापुढेही उद्रेक तयार झाला तर आश्‍चर्य वाटायला नको. व्यक्तीद्वेषातून आंदोलन करायचे काहीच कारण नाही. आज आम्ही ज्यांच्याविरोधात आंदोलन करतोय, त्यांच्यापेक्षा कितीतरी मोठ्या व्यक्तींविरोधात आंदोलन केले आहे. तेही व्यक्ती द्वेषातून नव्हते आणि आताचे देखील नाही.


आंदोलन आंदोलनच असते. शेतकर्‍यांचे प्रश्‍न सुटले असते आणि मी एखाद्या देवमाणसाविरुद्ध बोललो असतो तर माझ्या गाडीवर दगडे पडली असती. सरकार विरोधात आमचे सुरू असलेले आंदोलन लोकांच्या लक्षात येऊ नये, यासाठी काही मंडळी ही खेळ  करीत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला.


शेतकऱ्यांना गंडवले 


शेतकर्‍यांना गंडवले आणि फसवले जात आहे. सन्मान योजनेचा लाभ अनेकांना मिळत नाही. ऑनलाईन अर्ज करावे लागत आहेत. त्यामुळे राग व्यक्त केला जात आहे. तूर खरेदीबाबत सांगितले जाते एक आणि प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असल्याचेही खासदार शेट्टी म्हणाले.