राजू शेट्टीं ‘एनडीए’तून बाहेर पडणार ?
'स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना पक्षातून निलंबित केल्यामुळे राज्य शासनात आमचे प्रतिनिधित्व नाही. केंद्रात ‘एनडीए’ला आमचा बाहेरून पाठिंबा आहे. तेव्हा दोन्ही सरकारमध्ये आम्ही केवळ औपचारिकता म्हणून आहोत, असे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केले. शनिवारी पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर राजू शेट्टी हे एनडीएतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. शेतकरी कर्जमुक्तीबाबत सरकार असंवेदनशील असल्याने याबाबतचा निर्णय येत्या १५ दिवसांत राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
निवडणुकीपूर्वी भाजप व सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील शेतकऱ्यांना स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालाला दीडपड हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी तेथील कृषी क्षेत्राचा विकासदर वाढवल्याचे दर्शवले. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवत शेतकऱ्यांनी त्यांना मते देऊन सत्तेवर आणले. पण सत्तेवर आल्यानंतर सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडल्याने आता यापुढे एनडीएशी संबंध ठेवायचे का, याबाबत निर्णय घ्यावा लागेल असे राजू शेट्टी यांनी सांगितले.
'मंत्रीपद नकोच'
यावेळी केंद्रात मंत्रिपदाविषयीच्या चर्चांनाही त्यांनी पूर्णविराम दिला. आपण कधीही भाजपा नेत्यांकडे मागणी केलेली नाही. न मागता देईल एवढे भाजपाचे नेतृत्व उदारमतवादी नाही. मात्र, शेतकऱ्यांचे प्रश्न न सोडविल्यामुळे केंद्र सरकारने मंत्रिपदाची आॅफर दिली तरी आपण ते स्वीकारणार नाही, असेही खा. शेट्टी यांनी स्पष्ट केले.