राज्यसभा निवडणूक : फडणवीसांची खेळी यशस्वी, या दोघांना भाजपकडून विजय अर्पण
Rajya Sabha elections: राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या तीनही जागा निवडून आणण्याची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची खेळी यशस्वी झाली आहे.
मुंबई : Rajya Sabha elections: राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या तीनही जागा निवडून आणण्याची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची खेळी यशस्वी झाली आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपला महाविकास आघाडीची 9 ते 10 मतं मिळवण्यात यश आले आहे. भाजपच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीपेक्षा जास्त मतं मिळाल्यानं धनंजय महाडिक यांचा विजय झाला.
शिवसेनेचे दुसरे आणि महाविकास आघाडीचे सहावे उमेदवार संजय पवार यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. पहिल्या फेरीत संजय पवार यांना 33 मतं मिळाली होती. तर, धनंजय महाडिक यांना 27 मतं मिळाली आहेत. मात्र, दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे.
राज्यसभा निवडणुकीत भाजपकडे सहाव्या जागेसाठी कमी मतं असताना विजय मिळवत आघाडीला जोरदार दणका दिला आहे. या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यानी प्रतिक्रिया दिली आहे. आमचे तिन्ही उमेदवार विजयी झालेत. हा विजय आम्ही लक्ष्मण जगताप व मुक्ता टिळक यांना अर्पण करतो.
धनंजय महाडिक यांनी संजय राऊत यांच्या पेक्षा जास्त मते मिळाली आहेत. जे मत बाद झाले ते ग्राह्य धरले असते तरी आमचा विजय झाला असता. मलिक-देशमुख असते तरी आमचा विजय झाला असता. आमच्यासोबत नव्हते अशा आमदारांचेही आभार मानतो. जे स्वत:ला महाराष्ट्र, मुंबई समजतात त्यांना आता समजले असेल की ते म्हणजे महाराष्ट्र नाहीत, असा टोला फडवणीस यांनी शिवसेनेला लगावला आहे.
विजयाची मालिका अशीच सुरु राहिल, असंही फडवणीस म्हणाले. भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसाची भेट म्हणून कोल्हापूरचा पैलवान दिला आहे. पियूष गोयल यांना केवळ राज्यसभेचे खासदार म्हणून नव्हे तर राज्यसभेचे नेते म्हणून निवडून दिले, असे ते म्हणाले.
राज्यसभा निवडणुकीत अखेर भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव केलाय. धनंजय महाडिक विजय झाल्यानंतर कोल्हापुरातील त्यांच्या रुइकर कॉलनी इथल्या घरी कुटूंबियांनी आनंदोत्सव साजरा केला. महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांनी देखील गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त केला. भाजपचे धनंजय महाडीक 41 मतांनी विजयी झालेत. हा विजय फडणवीस आणि भाजमुळे झाल्याची प्रतिक्रीया महाडिक यांनी दिली आहे.