कलादिग्दर्शक राजू सापते आत्महत्या प्रकरण, मुख्य आरोपी अखेर गजाआड
लेबर युनियनचे पदाधिकारी त्रास देत असल्याचा आरोप करत राजू सापते यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती
पिंपरी-चिंचवड : सिने क्षेत्रातील नावाजलेलं नाव असलेल्या कलादिग्दर्शक राजू सापते यांनी पिंपरी-चिंचवडमधल्या वाकड इथं राहत्या घरी आत्महत्या केली होती. आत्महत्येस प्रवृत्त करणारा मुख्य आरोपी राकेश मौर्य याला गजाआड करण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे. मोर्या यांच्या अत्याचारामुळे आत्महत्या करत असल्याचं सपाते यांनी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये सांगतिलं होतं.
दिग्दर्शक राजू सापते यांनी 2 जुलैच्या रात्री राहत्या घरी आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ करून त्यांनी हे टोकाचे पाऊल आपण का उचलत आहोत याचं कारण दिलं होतं. राजू सापते यांनी युनियनचे पदाधिकारी आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप केला होता.
'व्हिडिओत नेमकं काय म्हटलं होतं'
आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये राजू सापते यांनी म्हटलं होतं, 'हा व्हिडीओ नशेमध्ये बनवत नसून मी पूर्णपणे शुद्धीत आहे. गेल्या काही दिवसांपासून मला लेबर युनियनमधल्या राकेश मौर्या यांच्याकडून खूप त्रास दिला जातोय. मी आतापर्यंत केलेल्या कामाचे कोणतेही पैसे थकीत नाही. सर्व देणी पूर्ण झालेलं असतानाही राकेश मौर्या हा व्यक्ती युनियनमधील काही कामगारांना मुद्दाम फोन करून, त्यांच्याकडून ते वदवून घेत आहेत की राजू सापतेने पैसे दिलेले नाहीत.’
'माझं पुढचं काम राकेश मोर्या सुरु करु देत नाहीयेत. राकेश मौर्या लेबर लोकांना माझ्याविरुद्ध भडकवत असल्यामुळे मला काम सुरू करता येत नाही. या गोष्टीचा निषेध म्हणून मी आत्महत्या करत आहे.' तसेच मला न्याय मिळवून द्या अशी मागणीही राजू सापते यांनी व्हिडिओमध्ये केली होती.