रक्षाबंधनाचा अनोखा सोहळा, महिला रुग्णांनी कोरोना योद्ध्यांना बांधल्या राख्या
कोविड रुग्णालयात रंगला अनोखा रक्षाबंधन सोहळा
आतिष भोईर, कल्याण : बहीण आणि भावाच्या पवित्र नात्याचं महत्व अधोरेखित करणारा दिवस म्हणजे रक्षाबंधन. मात्र या सणावर यंदा कोरोनाचं सावट असल्याने रक्षाबंधनाच्या दिवसाचा उत्साह कमी आहे. परंतू त्यातूनही खचून न जाता कल्याणच्या आयुष रुग्णलयात रक्षाबंधनाचा अनोखा सोहळा साजरा झाला. रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत असणाऱ्या महिलांनी रुग्णालयातील कोविड योद्ध्यांना राखी बांधून आजचा हा सण साजरा केला.
कोरोनाने लोकांना एकमेकांपासून दूर केले आहे. अनेकांना आपल्या कुटुंबाला देखील भेटता येत नाहीये. कोरोनामुळे अनेक जण बहिणीकडे राखी बांधण्यासाठी देखील जावू शकत नाहीत. पण कल्याणमधील आयुष हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी उपचारासाठी दाखल महिला रुग्णांकडून राखी बांधून घेण्यासाठी पुढाकार घेतला आणि इथल्या सर्वच बहिणाबाईंच्या आनंदाला पारावर उरला नाही. इथल्या डॉक्टरांसह अनेक कोविड योद्धे बंधुराजांनी आनंदाने ही प्रेमाची राखी बांधून घेत या महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले.
रुग्णांना बरं होण्यासाठी औषधांबरोबरच आपुलकीची आणि माणुसकीची गरज असते. आजच्या या अनोख्या रक्षाबंधनामूळे रुग्णांनाही एक मायेचा आधार मिळाला. तर डॉक्टरांसह कोरोना योद्ध्यांच्या चेहऱ्यावरही एक वेगळा आनंद पाहायला मिळाला.