आमंत्रण नाही तरी अयोध्येला जाणार, पण...; शरद पवारांचं मोठं विधान, घराणेशाहीच्या टीकेलाही उत्तर
Ayodhya Ram Mandir : जुन्नरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अयोध्या राम मंदिराच्या मुद्द्यावरुन महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. आपण अयोध्येला जाणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटल ंआहे.
हेमंत चापुडे, झी मीडिया, जुन्नर : अयोध्येतील भव्य दिव्य राम मंदिरात 22 जानेवारीला रामल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यसाठी देशभरातील लोकांना निमंत्रित करण्यात आलं आहे. मात्र याच निमंत्रणावरुन मोठं राजकारण देखील सुरु झालं आहे. अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना या सोहळ्यासाठी निमंत्रित न केले गेल्याने विरोधकांनी भाजपाला धारेवर धरलं आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या भव्यदिव्य सोहळ्याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
जुन्नर येथे विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल निर्मितीच्या प्रकल्पाच्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी राम मंदिराच्या कार्यक्रमाबाबत भाष्य केलं. तसेच यावेळी बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी घराणेशाहीवरुन केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं.
पंतप्रधान काल येऊन गेले. त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. ते म्हणाले घराणेशाही आलीये, ती मोडीत काढायला हवी. आता घराणेशाही म्हणजे नेमकं काय? डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, व्यापाऱ्यांचा मुलगा व्यापारी आणि शेतकऱ्यांचा मुलगा शेतकरी होती. मग राजकारण्यांचा मुलगा राजकारणात आला तर ही कशी काय घराणेशाही झाली. त्यामुळे पंतप्रधानांनी घराणेशाही बाबत बोलणं योग्य नाही. त्यांनी मूलभूत प्रश्नांवर बोलायला हवं, असंही शरद पवार म्हणाले.
अयोध्येचं आमंत्रण नाही, मात्र मी नक्की जाणार - शरद पवार
अयोध्येतील राम मंदिरात श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. मला त्याचं आमंत्रण आलेलं नाही. मी म्हटलं काही हरकत नाही. पण मी जाणार. मात्र मी 22 जानेवारीला जाणार नाही. त्यानंतर नक्की जाईन. श्रीराम हे सर्वांचे आहेत, असे शरद पवार म्हणाले.
"अयोध्येला जाणाऱ्या विमानाच्या तिकिटात वाढ केलेली आहे. दहा हजारांचे तिकीट चाळीस हजार करण्यात आलेत. विमानसेवा अशी महागली आहे, अशावेळी कोणी अयोध्येला गेला नाही तर त्या व्यक्तीला श्रीरामांबद्दल आस्था नाही, असा अर्थ काढणे चुकीचे राहील. राम मंदिराचे काम पूर्ण होत नाही, तो पर्यंत आम्ही जाणार नाही. अशी भूमिका चार शंकराचार्य यांनी घेतली आहे. आता मंदिराचे काम पूर्ण व्हायला आणखी दोन वर्षे तरी लागतील," असेही शरद पवार म्हणाले.