नवी दिल्ली : विधानसभा निवडणूकीचे मतदान 21 ऑक्टोबर रोजी होणार आहे. अद्याप भाजपा-शिवसेनेचे जागावाटप निश्चित झाले नसले तरी दोन्हीकडचे नेते एकमेकांना आपली ताकद दाखवताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीच्यावेळी राम मंदिर उभारण्याबाबत मुद्दा करण्यात आला होता. आता आगामी निवडणुकांपूर्वी राम मंदिराचा मुद्दा पुन्हा तापू लागला आहे.  शिवसेनेने हा मुद्दा पुन्हा रेटण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नाशिक दौऱ्यात मोदी यांनी राम मंरादिरावरून शिवसेनेला अप्रत्यक्षरित्या टोला हाणला होता. आता शिवसेना नेते संजय राऊत यांचे यासंदर्भातील ट्विट खूप बोलके आहे. हे ट्विट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


राम मंदिराचा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ट आहे. त्याची न्यायालयात सुनावणी सुरू असून दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकूण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे असे पंतप्रधान मोदींनी नाशिकच्या महाजनादेश यात्रेत म्हटले होते.  गेले काही दिवस काही वाचाळवीर उलटसुलट वक्तव्ये करून यामध्ये अडथळा निर्माण करत आहेत, असे थेट मोदी म्हणाले होते. परंतु शिवसेनेने आपल्या सामनाच्या अग्रलेखातून मोदींवर निशाणा साधला. 



राममंदिराचा विषय न्यायालयात आहे हे खरे, पण राममंदिर या विषयावर हवे तसे बोलणारे वाचाळवीर भाजपमध्येच आहेत. त्यामुळे पंतप्रधानांची नाशकातील चिडचिड समजून घेतली पाहिजे, असे टोकले आहे. आता संजय राऊत यांनी ट्वीट करुन भाजपाला उत्तर दिले आहे. या ट्विट मध्ये मंदिर वही बनायेंगे हे वाक्य दिसते. पण यातील 'र' हा शब्द खाली पडत आहे. त्यामुळे मंदि हाच शब्द फलकावर दिसतोय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आपल्या व्यगंचित्राद्वारे विरोधकांना टोलवत असतं. तीच परंपरा शिवसेनेने कायम राखत आपले म्हणणे व्यंगचित्रातून समोर आणल्याची चर्चा आहे. 


बडबोलेपणामुळे पंतप्रधानांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल तर भाजप नेत्यांनी राममंदिरावर बोलणे टाळले पाहिजे. भाजपच्या नेत्यांनी पंतप्रधानांची सूचना मान्य करून तोंडास कुलुपे घातली तर राममंदिराचा निर्णय लागलाच म्हणून समजा. पंतप्रधानांचीच तशी इच्छा आहे, असे अग्रलेखात नमुद करत शिवसेनेने भाजपलाच टोला लगावला आहे.