निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड : शेतीत काय ठेवलं असं म्हणणाऱ्यांच्या डोळ्यात एका शेतकऱ्यांनी झणझणीत अंजन घातलंय. महत्त्वाचं म्हणजे हा शेतकरही पुरूष नसून एक महिला आहे... मनमाडमधल्या बिरोळेच्या रमणबाई सुर्यवंशी... पाच मुली आणि एक मुलगा पदरात टाकून आत्महत्या करणाऱ्या पतीची कमतरता त्यांनी मुलांना कधी जाणवून दिली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रमणबाई सूर्यवंशी... नाशिकच्या बिरोळे गावात माळरानावर त्यांची पाच एकर शेती... हे माळरान त्यांनी काबाडकष्ट करून फुलवलं. त्यांचा हा प्रवास तुम्हा आम्हाला तोंडात बोटं घालायला लावणाराच... वयाच्या सातव्या वर्षीच रमणबाईंचं लग्न झालं. पण रमणबाई चौदाव्या वर्षी सासरी नांदायला आल्या आणि त्याच क्षणी त्यांच्या आयुष्यातल्या संघर्षाला सुरूवात झाली. घरची परिस्थिती बेताची. त्यामुळं पतीबरोबर सुमारे १५ वर्ष त्यांनी उसतोडणीचं काम केलं. 


कर्जबाजारीपणाच्या परिस्थितीला कंटाळून त्यांच्या पतीनं २६ वर्षांपूर्वी आत्महत्या केली. रमणबाईंच्या पदरी पाच मुली आणि एक मुलगा... पतीच्या जाण्याचं दु:ख करायलाही रमणबाईंना वेळ नव्हता. माऊलीनं नांगर हाती घेतला. नागरमई पेरणी, कोळपणी निंदणी खुरपणी असं सारं काम त्या स्व:त करु लागल्या. पाचही मुली आणि मुलाचं शिक्षण त्यांनी याच शेतीतून केलं त्यांची लग्नही केली.  


पुरुषांना लाजवेल अशी कामं आईनं शेतात केली वडिलांची कमतरता कधीच भासू दिली नाही त्यामुळंच आम्हाला तिच्यावर गर्व आहे, असं रमणबाईंचा मुलगा रवींद्र सूर्यवंशी यांनी म्हटलंय. 


पतीच्या निधनानंतर कुणाच्याही आधाराशिवाय आणि कुठल्याही समस्येचा बाऊ न करता रमणबाई स्वाभिमानानं उभ्या राहिल्य़ा. त्यांनी नुसतं शेतात काम केलं असं नाही तर यशस्वी शेती केली. बिरोळे परिसरात प्रथम बागायतदार आणि ऊस उत्पादक शेतकरी होण्याचा मानही रमणबाईंनी मिळवला. आसपासच्या भागातल्या सर्वच शेतक-यांना रमणबाईंचा अभिमान वाटतो. रमणबाईंनी नियतीलाही आपल्यापुढे झुकण्यास भाग पाडलं.