मुंबई : राज्य सरकारच्या गाडीचे फक्त स्टेरिंगच मुख्यमंत्र्यांच्या हाती आहे, मर्जी मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीची चालते असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरे नामधारी मुख्यमंत्री ठरले असून स्वतःच्या मना प्रमाणे तीन चाकी सरकारची गाडी ते चालवू शकत नाहीत.त्यांनी स्वतःच्या मनाने स्टीयरिंग फिरविण्याचा प्रयत्न केला तर काँग्रेस राष्ट्रवादी त्यांना तसे करू देणार नाही असेही आठवले म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अजित पवार यांनी ट्विट केलेल्या सूचक छायाचित्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या. शिवसेना खासदार संजय राऊत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिल्या. आता आठवलेंनी यात उडी घेतलीय.



महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे तीन पक्षाचे तिघाडी सरकार अस्तित्वात आहे. मात्र कोणत्याही पातळीवर हे महाविकास आघाडी सरकार सक्षम ठरले नसून तिघाडी चे बिघाडी झालेले सरकार ठरल्याचा पुनरोच्चार आठवलेंनी केला. लॉकडाऊनच्या काळातही दलितांवर राज्यात अत्याचार वाढते राहिले आहेत. कोरोनाचे वाढते संकट रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचे आठवले म्हणाले. 


कोणताही निर्णय तीन पक्षाचे सरकार एकमताने घेऊ शकत नाही. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे आपल्या मनाप्रमाणे त्वरित निर्णय घेऊन काम करू शकत नसणं अशी परिस्थिती आहे. 



उद्धव ठाकरे हे काँग्रेस राष्ट्रवादीशी युती करून वाट चुकलेत. ते आमच्या सोबत असायला हवे होते. मुख्यमंत्री म्हणून ते तीन चाकी सरकार चे फक्त स्टेयरिंगधारी चालक आहेत. खरे सत्ताधारी राष्ट्रवादी आणि काँग्रेस असल्याचे आठवले म्हणाले. 


रविवारी मध्यरात्री घड्याळावर बाराचा ठोका पडताच आणि २७ जुलै ही तारीख सुरु होताच अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांसोबतचा फोटो पोस्ट करत त्यांना शुभेच्छा दिल्या. या फोटोमध्ये एका इलेक्ट्रीक वाहनामध्ये उद्धव ठाकरे आणि अजित पवार हे बसलेले दिसत आहेत. तर, या वाहनाची स्टेअरिंग अर्थात ते चालवण्याची जबाबदारी ही खुद्द अजित पवार यांच्याकडे असल्याचं पाहायला मिळत आहे. छायाचित्रात स्टेअरिंग अजित पवार यांच्या हातात असलं तरी त्यांना गाड्या आम्ही पुरवतो असे संजय राऊत म्हणाले होते.