राज ठाकरे यांनी झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावे- आठवले
मनसे आणि भाजप एकत्र येऊन कोणालाही फायदा होणार नाही.
नाशिक: राज ठाकरे यांनी पक्षाचा झेंडा बदलण्यापेक्षा स्वत:चे मन बदलायला पाहिजे, अशी खोचक टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली. ते बुधवारी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर (मनसे) निशाणा साधला. आठवले यांनी नुकतीच भाजप आणि मनसेच्या संभाव्य युतीविषयी नाराजीही व्यक्त केली होती. भाजपने राज ठाकरे यांची साथ घेऊ नये, असेही त्यांनी सुचवले होते. याच भूमिकेचा त्यांनी कालच्या पत्रकारपरिषदेत पुनरुच्चार केला. मनसे आणि भाजप एकत्र येऊन कोणालाही फायदा होणार नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच मनसेच्या नव्या झेंड्याविषयीही त्यांनी टिप्पणी केली. राज ठाकरे यांनी पक्षाचा झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावे, असे आठवले यांनी म्हटले. त्यामुळे आता राज ठाकरे रामदास आठवले यांना काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, आज मुंबईत मनसेचे पहिले राज्यव्यापी महाअधिवेशन पार पडत आहे. यावेळी मनसेच्या नव्या झेंड्याचे अनावरण होईल. सूत्रांच्या माहितीनुसार, मनसेकडून दोन झेंडे तयार करण्यात आले आहेत. हे दोन्ही झेंडे भगव्या रंगाचे असून त्यापैकी पहिल्या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असेल. मात्र, झेंड्यावर राजमुद्रेची प्रतिमा असण्याला अनेकांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे मनसेकडून पर्याची झेंडाही तयार करण्यात आला आहे. या झेंड्यावर इंजिनाची प्रतिमा असेल. हे दोन्ही प्रस्तावित झेंडे निवडणूक आयोगाला पाठवण्यात आले आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) पहिले राज्यव्यापी अधिवेशन आज मुंबईतल्या गोरेगावमध्ये होत आहे. यानिमित्त गोरेगावमध्ये मेळाव्याची तयारी पूर्ण झाली असून राज्यभरातून मनसैनिक या मेळाव्यासाठी येणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिवसभर याठिकाणी उपस्थित राहणार असून संध्याकाळी राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.