छगन भुजबळ यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु असताना रामदास आठवले यांनी दिली मोठी ऑफर
भुजबळांनी आरपीआयमध्ये यावं अशी ऑफर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी दिलीय.
Chagan Bhujbal : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न-नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. भुजबळांविषयी हा मोठा दावा केलाय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी. ट्विट करत अंजली दमानियांनी हा दावा केलाय. अंजली दमानिया यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अशातच आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भुजबळ यांना मोठी ऑफर दिली आहे.
छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
आपण 17 नोव्हेंबरला अंबडला सभेला जाण्यापूर्वी राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या नावाने लिहून तो अजित दादांकडे दिला होता. या राजीनाम्याची वाच्यता करू नका, असं सांगण्यात आलं होतं, असा गौप्यस्फोट छगन भुजबळांनी केलाय. भुजबळांच्या राजीनाम्याच्या दाव्यावर खासदार संजय राऊतांनी टीका केली. राजीनामा स्वीकारण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे की उपमुख्यमंत्र्यांना हे आधी भुजबळांनी स्पष्ट करावं असं राऊत म्हणाले.
भुजबळांना रामदास आठवलेंची खुली ऑफर
ओबीसींच्या मुद्द्यावरुन मंत्रिपदाचा राजीनामा देणा-या भुजबळांना आता रामदास आठवलेंनीच खुली ऑफर दिलीय. छगन भुजबळ भाजपामध्ये आले तर त्यांचं स्वागतच आहे. मात्र, भुजबळांनी आरपीआयमध्ये यावं अशी ऑफर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी दिलीय. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी आज शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलं. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना आठवलेंनी भुजबळांना ऑफर दिलीय.
काय आहे अंजली दमानिया यांचा दावा?
छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा अंजली दमानियांनी केलाय. एके काळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय...तर छगन भुजबळांनी अंजली दमानियांनी केलेले आरोप फेटाळून लावलेत.
भुजबळ भाजप च्या वाटेवर....? एके काळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार? अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी? कुठे फेडाल हे पाप... असे ट्विट अंजली दमानि यांनी केले आहे.
भुजबळ भाजपचा चेहरा बनणार असल्याच्या चर्चेवर संजय राऊतांनी टीका केलीय. भ्रष्टाचार हाच भाजपचा चेहरा असल्याचा टोला राऊतांनी लगावलाय. तर सध्या दमानिया सुप्रियाताईंच्या संपर्कात असल्यामुळे असं बोलत असतील असा टोला उपमुख्यमंत्री फडणवीसांनी लगावलाय.
असा आहे भुजबळांचा राजकीय प्रवास?
छगन भुजबळ यांनी शिवसेनेतून राजकारणाला सुरुवात केली. नगरसेवक ते मुंबईचं महापौरपद त्यांनी भूषवलं आहे. ओबीसी-मंडल आयोग मुद्द्यावर शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. शरद पवारांच्या नेतृत्वात भुजबळ यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि कॅबिनेटमंत्री पद भूषवले. शरद पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य त्यांनी स्वीकारले. यानंतर त्यांनी महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद भूषवलं. अलिकडे शरद पवारांची साथ सोडत छगन भुजबळ अजित पवारांसोबत बंडात सामील झाले. समता परिषदेच्या माध्यमातून लाखोंचा ओबीसी समाज भुजबळांनी जोडला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे ओबीसी समाज भाजपवर नाराज असल्याची चर्चा आहे, याच काळात भुजबळ ओबीसींची वज्रमूठ बांधण्यात यशस्वी झालेत. त्यामुळे भुजबळांचा भाजपला फायदा होऊ शकतो असा अंदाज बांधला जातोय, त्यात दमानियांच्या ट्विटनंतर भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आणखी जोरात सुरु झाल्यात..