एव्हरेस्ट सर केल्याचा दावा करणारे पोलीस दाम्पत्य बडतर्फ
जगातील सर्वात मोठं शिखर असलेलं एव्हरेस्ट शिखर सर केल्याचा खोता दावा करणाऱ्या पुणे पोलिस खात्यातील राठोड दाम्पत्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलंय.
पुणे : जगातील सर्वात मोठं शिखर असलेलं एव्हरेस्ट शिखर सर केल्याचा खोता दावा करणाऱ्या पुणे पोलिस खात्यातील राठोड दाम्पत्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलंय.
या दाम्पत्याने केलेल्या खोट्या दाव्यामुळे पोलिस दलाची बदनामी झाल्याचं कारण देत त्यांना बडतर्फ करण्यात आलंय.
23 मे 2016 रोजी एव्हरेस्ट शिखर सर केल्याचा दावा पुणे शहरातील तारकेश्वरी राठोड आणि दिनेश राठोड या पोलिस कॉन्स्टेबल दाम्पत्याने केला होता. त्यांनी चक्क पत्रकार परिषद घेऊन एव्हरेस्ट सर करणारे पहिले पती-पत्नी असल्याचा खोटा दावाही केला होता. मात्र, त्यांचा हा खोटारेडपणा उघड झाला होता. त्यांनी फोटोशॉप करून फोटो समोर आणल्याचं उघड झालं होतं.
या दांम्पत्याने केलेल्या दाव्यावर काही गिर्यारोहकांनी शंका उपस्थित केली होती. त्यानंतर पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यांची चौकशी केल्यानंतर 16 नोव्हेंबर 2016 रोजी दोघांना पोलिस दलातुन निलंबित करण्यात आलं होतं. पुढे नंतर चौकशी अधिकाऱ्यांसमोर राठोड दाम्पत्य हजरच राहिले नाहीत.
तारकेश्वरी आणि दिनेश राठोड यांचा खोटारडेपणा समोर आल्यानंतर नेपाळ सरकारनेही त्यांच्यावर दहा वर्षांची बंदी घातली. चौकशी समितीचा अहवाल मिळाल्यानंतर पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी राठोड दांपत्याला पोलिस खात्यातून बडतर्फ करण्याचे आदेश दिले.