प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : वेगात जाणाऱ्या वाहनांचा अपघात होऊ नये म्हणून प्रशासनाकडून रस्त्यावर स्पीड ब्रेकर (speed breaker) लावण्यात येतात. मात्र स्पीड ब्रेकरमुळे एका महिलेला जीव गमवावा लागला आहे. रत्नागिरी (ratnagiri) जिल्ह्यात झालेल्या या अपघातात एका महिला शिक्षिकेला आपला जीव गमवावा लागला आहे. जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका असलेल्या सुषमा जयवंत निकम (55) यांचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. स्पीड ब्रेकरवर सुषमा निकम यांची दुचाकी आदळल्याने हा भीषण अपघात झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोहाने जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका सुषमा निकम या शाळेतून सुटल्यानंतर दुचाकीच्या मागे बसून भरणे बाईतवाडी येथील आपल्या घरी परतत होत्या. निकम यांची दुचाकी कुडोशी येथील स्पीड ब्रेकरवर जोरात आदळली. दुचाकी जोरात आदळल्याने सुषमा निकम या वर उडाल्या आणि रस्त्यावर आदळल्या. यामध्ये निकम यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करत निकम यांचा मृतदेह  तपासणीसाठी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला.


मुंबई आग्रा महामार्गावर विचित्र अपघात


दुसरीकडे, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर जवळील सावळदे तापी नदी पुलावर एक विचित्र अपघात झाल्याचे समोर आले आहे. महामार्गावरील नदीच्या पुलावर मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या क्रुझर वाहनाचा टायर फुटल्याने क्रुझर पलटली. हा अपघात झाला त्याच वेळी मागून येणाऱ्या अवजड भरधाव वाहनाचा तोल जाऊन पुलाचे कठडे तोडून तापी नदीत कोसळला. हा अपघात रात्री झाल्याने नेमकं काय झाले हे कोणालाही स्पष्ट सांगता येत नव्हते. या अपघातात क्रुझर मधील मजूर किरकोळ जखमी झाले आहेत.  जखमी झाल्या मजुरांना शिरपूर येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.