रत्नागिरी : कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेतल्यानंतर गणपतीपुळ्यात श्रींच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या गाडीला संगमेश्वर तालुक्यातील दाभोळेजवळ भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये २ जण जागीच ठार झाले, तर ४ जण जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातील सहाजण मित्राच्या वाढदिवसानिमित्त देवदर्शनासाठी सकाळी बाहेर पडले. दरम्यान या मित्रांमधील एकाचा वाढदिवस होता. त्यामुळे वाढदिवसानिमित्त देवदर्शनही होईल असे सर्वांचे नियोजन होते. पहाटे साडेपाचच्या सुमारास पुण्यातून ते निघाले होते. आधी कोल्हापुरला महालक्ष्मीच्या दर्शनासाठी ते गेले होते.


कोल्हापूर- रत्नागिरी मार्गे गणपतीपुळ्याला श्रींच्या दर्शनासाठी ते निघाले. मात्र, संगमेश्वर तालुक्यातील दाभोळेजवळ त्यांच्या चारचाकी गाडीला अपघात झाला. गाडी थेट झाडावर जाऊन आदळली. हा अपघात एवढा भीषण होता, की दोघांचा या अपघातात मृत्यू झाला, तर ४ जण जखमी झाले. या जखमींवर सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.