रत्नागिरी कोरोना मुक्त झाल्याने आपली जबाबदारी वाढली - उदय सामंत
`रत्नागिरी जिल्हा कोरोना मुक्त झाला तरी आता आपली जबाबदारी अधिक वाढली आहे.`
मुंबई : रत्नागिरी जिल्हा कोरोना मुक्त झाला तरी आता आपली जबाबदारी अधिक वाढली आहे. त्यामुळे लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या नियमांचे कोणीही उल्लंघन करु नये. रत्नागिरीकरांनी आतापर्यंत जसे सहकार्य केले तसेच सहकार्य ३ मेपर्यंत करावे, असे आवाहन उच्चतंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले आहे. सहा महिन्याच्या बाळाचा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. आता आपली जबाबदारी वाढली, असे सामंत म्हणालेत.
जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. मात्र, दुबईतून गुहागर येथील शृंगारतळी येथे आलेल्या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली होती. हा पहिला रुग्ण होता. या रुग्णावर उपचार करण्यात आले. हा पहिला रुग्ण आता बरा होऊन घरी गेला आहे. आता सहा महिन्यांचे बाळ बरे झाले आहे. त्यामुळे ही आपल्या जिल्ह्यासाठी एक चांगली बाब आहे. आपला जिल्हा कोरोना मुक्त झाला ही बाब चांगली असली तरी घबरदारी घ्यायला पाहिजे. आजही काही जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांनीही घबरदारी घेण्याची गरज आहे, असे सामंत यांनी म्हटले आहे.
साखरतर गावातील सहा महिन्यांचं बाळ १४ एप्रिल रोजी कोरोनाबाधित असल्याचं स्पष्ट झाले होते. बाळावर उपचार करण्यासाठी खास दोन बालरोग तज्ज्ञ डॉक्टर काम करत होते. त्यासाठी खास अशी एक टीम या बाळावर उपचार करण्यासाठी तैनात होती. त्यांच्या याच प्रयत्नामुळे या बाळावर यशस्वी उपचार हे झाले आहेत. हे बाळ आता कोरोनामुक्त झाले आहे. या बाळावर उपचार डॉ. दिलीप मोरे यांचे आभार मानन्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी चांगली काळजी घेतली आणि काही अवधीत जिल्हा कोरोना मुक्त झाला आहे.