रत्नागिरीत पावसाळ्यात भरणारी नांगरणी स्पर्धा जीवावर बेतली
या खेळावर बंदी घालण्याची मागणी
प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : रत्नागिरीत पावसाळ्यात भरणाऱ्या नांगरणी स्पर्धा जीवावर बेततील की काय, याची भीती आहे. कारण संगमेश्वरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या स्पर्धेत बैल उधळले आणि ८ जण जखमी झाले. त्याचबरोबर या स्पर्धा बैलांवरही अन्याय करणाऱ्या ठरत आहेत.
रत्नागिरीत पावसाळ्यामध्ये सर्रास अशा स्पर्धा होतात. खरं तर ही बैलगाडी शर्यतच. पण नांगरणी स्पर्धा नावानं या स्पर्धा ओळखल्या जातात. कितीही थरारक आणि मनोरंजक हा प्रकार वाटत असला तरी आता या स्पर्धा जीवघेण्या ठरतात की काय, अशी भीती आहे.
पाटगावमधली स्पर्धेत बैल उधळले आणि नांगर धरलेला स्पर्धक अक्षरशः फरफटत गेला. या स्पर्धेत बैल उधळण्याचं मुख्य कारण म्हणजे बैल जोरात धावावेत म्हणून नांगर धरणाऱ्यानं बैलाची शेपटी पिरगळली. शेपटी पिरगळल्यानं बैल उधळले आणि सैरावैरा पळू लागले. यामध्ये आठ जण जखमी झाले. त्यामुळे या स्पर्धा आता जीवघेण्या ठरत आहेत. आता यावर बंदी घालण्याची मागणी होते आहे.
स्पर्धा जिंकण्यासाठी बैलांना उत्तेजक द्रव्य देवून वेगानं पळायला लावलं जातं. त्याशिवाय बैलांना खिळे टोचणे, शेपट्या वेगाने पिरगळणे असे अघोरी प्रकार केले जातात.
स्पर्धेच्या नावाखाली अक्षरशः जत्रा भऱते. पण अनुचित प्रकार घडला तर जबाबदारी कुणाची, याचं उत्तर कुणाकडेच नाही.
वेळीच या स्पर्धेकडे लक्ष देऊन हा प्रकार थांबवायला हवा. किमान सुरक्षेचे पुरेसे उपाय आखूनच या स्पर्धा घ्यायला हव्यात. दुर्घटना घडल्यावर दोषींच्या जबाबदारीचे खेळ करण्यात काहीच अर्थ नाही.