दुर्गप्रेमींनी जीव धोक्यात घालून 400 फूट दरीतली तोफ आणली गडावर
रत्नागिरी-रसाळगड किल्ल्यावरील 400 फूट दरीतील तोफ दुर्गसेवकांनी पुन्हा गडावर आणली.
देवेंद्र कोल्हटकर, झी 24 तास, रत्नागिरी : 400 फूट खोल दरीतून तोफ पुन्हा गडावर आणण्याची विक्रमी कामगिरी दुर्गप्रेमींनी केली आहे. 23 जानेवारी 2022 रोजी सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत रसाळगडावर दुर्गसंवर्धन मोहिमेचे आयोजन करण्यात आलं होतं.
या मोहिमेदरम्यान गडाच्या दक्षिण दिशेकडील दरीमध्ये 400 फूट खोल दरीमध्ये मध्ययुगीन काळातील पाण्याचे स्तंभ टाके असून त्याच्या शेजारीच अर्धा टन वजनाची आणि 5 फूट लांबीची तोफ हि वर्षोनुवर्ष दुर्लक्षित स्थितीत होती.
अवघ्या 4 तासात संस्थेच्या 40 दुर्गसेवकांनी ही तोफ गडावर आणली आणि गडावरील झोलाई देवीच्या मंदिरासमोर तोफ ठेवण्यात आली. या वेळी दुर्गसेवकांनी एकच आनंद जल्लोष व्यक्त केला. कित्येक वर्षांपासून हि तोफ दरीमध्ये पडून दुर्लक्षित होती. ही तोफेस आज गडावर विराजमान झाली असून आता ही तोफ पर्यटक पाहू शकतात.
या संदर्भातील अहवाल राज्य पुरातत्व विभागाल सादर करण्यात आला असून सध्या गडावरील एकूण 18 तोफा आहेत. हा किल्ला जिल्ह्याच्या पर्यटन विकास दृष्टीने महत्वाचा असून जिल्ह्यातील शिवप्रेमींनी या गडाच्या संवर्धन कार्यात सामील व्हावे असे आव्हान खेड विभाग प्रमुख अमोल भुवड यांनी केले.