वाशिष्ठी-जगबुडी नद्यांना पूर, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक रोखली
उत्तर रत्नागिरीला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. मुंबई - गोवा महार्गावरील वाहतूक रोखण्यात आली आहे.
रत्नागिरी : उत्तर रत्नागिरीला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. त्याचवेळी पठारावरील सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. कोयना परिसरातही मुसळधार असल्याने चिपळूणमधील वाशिष्ठी नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी बाजारपेठेत घुसले असून व्यापाऱ्यांनी धास्ती घेतली आहे. तर खेडमधील जगबुडी नदीलाही पूर आला आहे. नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे चिपळूण आणि खेड दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई - गोवा महार्गावरील वाहतूक रोखण्यात आली आहे.
खेड, चिपळूण, गुहागर दापोली आणि मंडणगड तालुक्यात मुसळधार पावसाची कोसळधार सुरू आहे. सतत कोसळत असलेल्या पावसामुळे चिपळूणच्या वाशिष्ठी नदी, शिव नदी आणि खेडच्या जगबुडी नदीला पूर आलाय. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच खेडच्या जगबुडी नदीवरची वाहतूक प्रशासनाने बंद केली आहे. जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून खेड शहरातील नदी काठावरील लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, गुहागरमधील पालशेत बाजारपेठेत नदीचे पाणी घुसले असून मुसळधार पावसामुळे पालशेतमधील पूल गेला पाण्याखाली होता. चिपळूण आणि खेड येथील नद्यांना पूर आल्याने मुंबई - गोवा महार्गावरची वाहतूक वळविण्यात आली आहे.