मुंबई : रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून चक्रीवादळाचा तडाखा बसण्यास सुरुवात झाली आहे. किल्ला परिसरात वृक्ष कोसळून पडल्याने घराचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच किनारपट्टी भागातील नारळ  आणि सुरुची झाडे मोडून पडली आहेत. राजिवडा, मांडवी किनाऱ्यावरही झाडांची पडझड झाली आहे. संगमेश्वर तालुक्यात देवरुख येथे घरांचे मोठे नुकसान झाले आहे. तर भरकटलेलं जहाज रत्नागिरीच्या मिऱ्या समुद्रातील अजस्त्र लाटांमध्ये अडकले आहे. जहालाजा मिरकरवाडा बंदरात नेण्यात अपयश आले आहे. जहाजावर काही खलासी असण्याची भीती वर्तविण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING



रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय.  खारेघाट रोड येथील काशी विषश्वेवर मंदिराच्या बाजूला वादळामुळे झाड मध्येच तुटले. गुहागर, दापोली, मंडणगड आणि रत्नागिरीत हा मुसळधार पाऊस कोसळतोय. हा निसर्ग चक्रीवादळाचा परिमाण असून वाऱ्याचा वेगही वाढलाय. ताशी ८० ते १०० किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. संगमेश्वरमधील देवरुखमध्ये देखील पाऊस आणि वाऱ्यानं जोर धरला आहे. देवरुखमधील भंडारवाडीत झाड कोसळून घराचं नुकसान झाले आहे. 


निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम किनारपट्टीपासून ५० किमी दूर असलेल्या देवरुखातही जाणवत आहे. काल मध्यरात्रीपासून परिसरात रिमझिम पाऊस सुरु होता. तर सकाळी ६ वाजल्यापासून पावसानं जोर धरला असून आता पावसासोबत वाराही वेगानं वाहतोय. शहरातील भंडारवाडी इथं वाऱ्यानं एक वृक्ष मुळासकट उन्मळून पडलाय. त्यामुळे घरांचं आणि शौचालयांचंही नुकसान झाले आहे.