मिलिंद आंडे, झी मीडिया, वर्धा: गेल्या काही दिवसांत मुंबईतील रुग्णालयातून मृतदेह गायब होण्याच्या घटना आपल्यापैकी अनेकांच्या कानावर आल्या असतील. मात्र, वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात याहून धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवलेल्या लहान मुलाचा मृतदेह उंदरांनी कुरडतल्याचा प्रकार समोर आला आहे.वर्धा जिल्ह्यातील रेंनकापूर येथे शुक्रवारी सायंकाळी अंगणात खेळत असलेल्या अडीच वर्षीय प्रथम उर्फ गणेश राजू निखाडे हा  पाण्याच्या टाकीत पडला होता. त्याला उपचारासाठी समुद्रपूरच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यापूर्वी राजू निखाडेचा मृत्यू झाला होता. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर कुटुंबीयांनी राजूचा मृतदेह ताब्यात देण्याची मागणी केली. मात्र, शवविच्छेदन झाल्याशिवाय मृतदेह मिळणार नाही, असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. त्यासाठी रुग्णालयाच्या शवागारात राजूचा मृतदेह ठेवण्यात आला. 

आज सकाळी शवविच्छेदन करण्यासाठी जेव्हा बालकाचे शव बाहेर काढण्यात आले तेव्हा मृतदेह उंदरांनी कुरतडल्याचे निदर्शनास आले. हे पाहून या मुलाचे कुटुंबीय प्रचंड संतापले. त्यामुळे रुग्णालयाच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तहसीलदार राजू रणवीर यांनी पोलिसांसह रुग्णालय गाठले. त्यांच्या मध्यस्थीनंतर हा तणाव निवळला. दरम्यान, या घटनेची चौकशी केली जाईल. दोषी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन जिल्हा चिकित्सक पुरुषोत्तम मडावी यांनी दिले.