`जितेंद्र आव्हाडांविरोधात तक्रार करण्याआधी `ती` महिला मुख्यमंत्र्यांना भेटली`
जितेंद्र आव्हाड प्रकरणात आणखी एक ट्विस्ट, महिलेची आणि मुख्यमंत्र्यांची झाली होती भेट!
MLA Jitendra Awhad Resign : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यावर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे आव्हाडांनी आपला राजीनामा सोपवला आहे. त्यानंतर सोमवारी दुपारी जयंत पाटील यांनी आव्हाडांसोबत पत्रकार परिषद घेत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
भाजप पदाधिकारी रीदा राशिद यांनी जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल केला आहे. रीदा राशिद या त्याच रात्री 12 नंतर मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यादरम्यान रीदा राशिद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असल्याचा गौप्यस्फोट जयंत पाटील यांनी केला आहे. आव्हाडांविरोधात कोण षडयंत्र रचतंय हे कळण्यासाठी महाराष्ट्राची जनता सूज्ञ असल्याचंही पाटील म्हणाले. पत्रकार परिषदेमध्ये व्हिडीओ चालू करत मुख्यमंत्री आणि रीदा राशिद यांचा फोटो स्क्रीनवर दाखवला.
खालच्या स्तराचे आरोप झाल्याने आव्हाड व्यथित झाले आहेत. पोलीससुद्धा कायद्याने वागत नाहीत. आव्हाडांनी माझ्याकडे राजीनामा सोपवला असून त्याबाबतचं पत्र मला दिलं आहे. लवकरच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: ती क्लिप पहावी कारण विनयभंग झाल्याचं कुठे दिसत नाही. मुख्यमंत्री त्यामध्ये लक्ष घालतील अशी अपेक्षा असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
दरम्यान, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना, एकवेळ खूनाचा गुन्हा चालेल पण 354 कलम दाखलं करणं मनाला लागलं. इतक्या खालच्या पातळीवरील राजकारण महाराष्ट्रात होऊ नये, घरं उद्ध्वस्त होतील, असं आव्हाड म्हणाले. पाटलांनंतर आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही पत्रकार परिषद घेत सरकारवर निशाणा साधला आहे.