मुंबई : चार दिवसांपूर्वी विधानसभेत पेन ड्राईव्हद्वारे 'व्हिडीओ बॉम्ब" टाकल्यानंतर आज पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी एक पेन ड्राईव्ह सभागृहात सादर केला. यावरून गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांनी फडणवीस यांना चांगलाच टोला लगावला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानमंडळाच्या २०२१ च्या अधिवेशनात काँग्रेस सदस्य नाना पटोले यांनी फोन टॅपिंग होण्याचा विषय मांडला होता. त्यावर चौकशी करायला सांगितले होते. २०१५ ते २०१९ या काळात झालेल्या फोन टॅपिंगची पडताळणी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमली. या समितीने दिलेला अहवाल राज्य सरकारने स्वीकारला.


या अहवालात आमदार नाना पटोले यांचे नाव अमजदखान ठेवले होते. आताचे राज्यमंत्री बच्चू कडू यांचे नाव निजामुद्दीन बाबू शेख नागपाडा, मुंबई, भाजप खासदार संजय काकडे हे तर तुमचेच होते. तुम्ही त्यांनाही सोडलं नाही. त्यांचे नाव ठेवले तरबेज सुतार, कात्रज, नागपूरचे आमदार आशिष देशमुख देखील त्यावेळी भाजपचे आमदार होते. त्यांचे  नाव ठेवले रघू चोरगे आणि आशिष देशमुख यांच्या दुसऱ्या नंबरला नाव दिले हिना महेश साळुंखे. पुरुषालाही तुम्ही महिला बनविले. या सर्वावर अंमली पदार्थ अवैध विक्रीचा आरोप ठेवून त्यांचे फोन टॅप केले. 


सत्ता असो वा नसो. पण , एक अधिकारी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या बाबतीत अशी पाळत ठेवतो. आमच्या सदस्यांवर पाळत ठेवली असती तर समजू शकलो असतो, पण भाजपच्या सदस्यांवरही पाळत ठेवली जात होती. हे कुणाच्या आदेशाने होत होते? असा सवाल गृहमंत्र्यांनी केला.


आपण केंद्रीय यंत्रणाचा वापर करता. पण, त्याआधी आपले प्रवक्ते जाहीर करतात की, अमुक तमुक नेत्यावर कारवाई होणार आणि दुसऱ्या दिवशी कारवाई होते. यामध्ये काही हॉटलाईन बसवली आहे का? असा टोला त्यांनी लगावला. 


विरोधी पक्षनेते फडणवीस म्हणतात की, ते न्यायालयात जाणार आहेत. मला त्याचा आनंद आहे की एका तरी यंत्रणेवर त्यांचा विश्वास आहे. आपण मुख्यमंत्री होतात तेव्हा राज ठाकरे यांना ३३ हजार विहिरींच्या जलयुक्त शिवार कामाचा एक पेन ड्राईव्ह आपण दिला. 


दोन दिवसापूर्वी १२५ तासांचे व्हिडीओ रेकॉर्डिंग असलेला एक पेनड्राईव्ह दिला. आजही एक पेन ड्राईव्ह दिला. तुम्ही ज्या मुदसीर लांबे याचे नाव घेतले. त्यांची वक्फ बोर्डात निवड सरकारने केली नाही. तो निवडून आला आहे. विनाकरण सगळीकडे दाऊद दाऊद असे करू नका. एकावर एक पेन ड्राईव्ह देऊन आरोप करता आहात म्हणजे आपण काय डिटेक्टिव्ह एजन्सी काढली की काय? असा टोला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी फडणवीसांना लगावला.