कैलास पुरी, झी मीडिया, पुणे : मराठा आणि कुणबी समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी जीवनदान ठरलेल्या पुण्यातल्या सारथी संस्थेवर लादण्यात आलेले निर्बंध काढल्याचे जाहीर करण्यात आले असले तरी सारथी बाबत अजूनही संभ्रम आहे. निर्बंध काढल्याचे कोणतेच आदेश प्राप्त झाले नसल्याचे सारथीकडून स्पष्ट करण्यात आल्याने सारथीचं भवितव्य काय असा प्रश्न उपस्तिथ झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरक्षणाची मागणी करत मराठा समाजाकडून अनेक मोर्चे काढण्यात आल्यानंतर राज्य सरकारने मराठा आणि कुणबी समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळावी आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या साठी सारथी ही स्वायत्त संस्था स्थापन करण्यात आली. मात्र अवघ्या 9 महिन्यात संस्थेने बाळस धरलं असतानाच आचारसंहिता आणि राष्ट्रपती राजवटी दरम्यान प्रधान सचिव जे पी गुप्ता यांनी विविध आदेश काढत संस्थेचे पंख छाटण्याचे काम केल्याचा आरोप संस्थेचे संचालक डी आर परिहार यांनी केला आहे.


गुप्ता यांनी काढलेल्या अद्यादेशामुळे संस्थेला आर्थिक मदत बंद झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांना मानधन आणि फेलोशिप द्यायची कशी असा प्रश्न पडल्याचे सारथीमधल्या कर्मचाऱ्यांना पडला आहे. तर या निर्णयामुळे उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या मराठा आणि कुणबी समाजातील विद्यार्थ्यांचं नुकसान होत असल्याची भावना आहे. 


आता या प्रकरणावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची गरज व्यक्त होते आहे. जर तोडगा निघाला नाही तर संस्था बंद करण्याशिवाय पर्याय उरणार नाही आणि अर्थातच याचे राजकीय आणि सामाजिक परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही.