Revas Reddy Coastal Highway: मुंबई-गोवा महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या महामार्गाचे काम सुरू आहे. या महामार्गाबरोबरच आता महाराष्ट्राला कोकणात जाण्यासाठी दोन महामार्ग मिळणार आहेत. या महामार्गाचा उद्देश म्हणजे कोकणातील पर्यटनस्थळांना चालना मिळावी हे आहे. महाराष्ट्राला सुंदर समुद्र किनारा लाभला आहे. कोकणाला लाभलेल्या या सुंदर समुद्र किनाऱ्याच्या साक्षीने प्रवास करण्याची इच्छा अनेकांची असते. आता प्रत्यक्षात ही इच्छा पूर्ण होणार आहे. कोकणातील 93 पर्यटनस्थळांना जोडणाऱ्या सागरी किनारी मार्गाचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC)ने पावलं उचलली आहे. काय आहे हा प्रकल्प जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्राला 720 किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवासादरम्यान किनारपट्टी जवळून सागरी किनारा महामार्गाची योजना आखण्यात आली आहे. या महामार्गाचा विकास झाल्यास कोकणातील समुद्र किनाऱ्यालगतच्या पर्यटनास चालना मिळणार आहे. तसंच, प्रवासाचा वेगही वाढणार आहे. निसर्गरम्य परिसरातून हा मार्ग जाणार आहे त्यामुळं पर्यटकांना कोकणचं वैभव अनुभवता येणार आहे. सरकारने रेवस ते रेड्डी असा सागरी महामार्गासाठी निविदा मागवल्या होत्या. बांधकाम निविदा अंतिम करण्याच्या प्रक्रियेला वेग दिला आहे. येत्या काही महिन्यात या प्रकल्पाचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. 


महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने रेवस ते रेड्डी सागरी किनारा  प्रकल्पाअंतर्गत एमएसआरडीसीने रेवस ते कारंजा आणि आगरदांडा ते दीघी अशा दोन खाडीपुलांसाठी तांत्रिक निविदा मागविल्या होत्या. या निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला असून या दोन्ही खाडीपुलांसाठी एकूण पाच निविदा सादर झाल्या आहेत. रेवस ते कांरजासाठी दोन तर आगरदांडा ते दीघीसाठी तीन निविदा सादर झाल्या आहेत. तर आता लवकरच आर्थिक निविदा खुल्या करण्यात येणार आहेत. रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणार आहे. 


कसा आहे सागरी किनारा मार्ग?


रेवस-रेड्डी सागरी किनारा रस्ता अंदाजे 447 किमी लांबीचा आहे. मूळ रेवस- रेड्डी असा सागरी महामार्ग सलग नसणार आहे. आठ खाडीपुल बांधून सागरी किनारा मार्ग तयार करण्यात येणार आहे. त्यानुसार, रेवस, दिघी, बाणकोट, केळशी, दाभोळ, भाट्ये, वाडातिवरे अशा ठिकाणी खाडीपुल बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी 10 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून या किनारा मार्गामुळं पर्यटकांना कोकणचे सौंदर्य आणि समुद्र किनारे पाहत प्रवास करता येणार आहे. विशेष म्हणजे कोकणातील 93 पर्यटकांना हा मार्ग जोडणार आहे. 


सागरी किनारा प्रकल्प कधी सेवेत येणार?


रेवस-रेड्डी सागरी किनारा प्रकल्प काम सुरू झाल्यानंतर पाच वर्षात पूर्ण होणे अपेक्षित आहे. म्हणजेच 2030 मध्ये प्रवाशांना सागरी किनारा मार्गावरुन प्रवास करु शकता. मात्र या मार्गावरुन वेगवान प्रवास करता येणार नाही कारण वळणदार मार्ग आणि खाडी पुल असल्यामुळं अतिवेगवान प्रवास करणे शक्य होणार नाही.