कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : ठाण्यात रिक्षाचालकाकडून महिला प्रवाशाच्या विनयभंगाच्या घटना थांबण्याचं नावच घेत नाहीय. पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा अशी घटना परत घडलीय. यामुळे संताप व्यक्त होतोय. अशा चालकांचं परमिट आणि लायसन्स कायमस्वरूपी रद्द करावं, अशी मागणी ठाण्यात मुलींनी आणि महिलांनी केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झपाट्य़ाने वाढलेल्या ठाणे शहरात प्रवासासाठी अनेक साधनं असली तरी रिक्षावरच बहुतांश ठाणेकर अवलंबून असल्याचं दिसतं. मात्र मुजोर रिक्षाचालकांकडून सातत्य़ाने महिला प्रवाशांना त्रास होत असल्याचं वारंवार घडतंय. गेल्या १५ दिवसांत तर दोनदा असे प्रकार घडलेत. ठाणे रेल्वे स्थानक परिसरातच रिक्षाचालकाने तरूणीचा विनयभंग केला. या प्रकरणातल्या आरोपी रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. तरुणी स्टेशन परिसरातून कामावरून घरी निघालेली होती.  रस्ता ओलांडताना क्षुल्लक कारणवरून तिचा रिक्षाचालक सिंकदर शेखशी वाद झाला. रिक्षा चालकानं तरुणीशी बोलताना अपशब्द वापरले, तिला धक्काबुक्की करून तिचा विनयभंग केला.  तरुणीनं तात्काळ बीट मार्शलकडे तक्रार केल्यावर सिकंदर शेखला ताब्यात घेतलंय. 


काही वर्षांपूर्वी स्वप्नाली लाड या मुलीला चालत्या रिक्षातून खाली फेकण्यात आलं होतं. पुढे काही महिन्यातच रत्नागिरीवरून शिक्षण घेण्यासाठी आलेल्या दोन मुलींना एक रिक्षाचालक पळवून घेऊन चालला होता. त्यावेळी नितीन कंपनीजवळ या मुलींनी जीव वाचवण्यासाठी रिक्षातून उडी मारली होती. १५ दिवसांपूर्वी आणखी एका तरूणीचा विनयभंग रिक्षाचालकाकडून झाला तर आता परत ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातच विनयभंग करण्याची रिक्षाचालकाची मजल गेलीय. 


या घटनांमुळे महिला प्रवाशांत संतापाचं वातावरण आहे. महिला प्रवाशांवर रिक्षाचालकांकडून असं संकट ओढवतं तेव्हा आजूबाजूचे लोकही बघ्याची भूमिका घेतात याविषयीही संताप व्यक्त होतोय. महिला प्रवाशांना त्रास देणाऱ्या रिक्षाचालकांचं लायसन्स आणि परमिट कायमस्वरूपी रद्द होण्याची गरज महिला प्रवाशांनी व्यक्त केली.


अशा घटना वारंवार घडत असल्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी शहरातील रिक्षाचालकांना त्यांची सविस्तर माहिती रिक्षात प्रदर्शित करण्याची सक्ती केलीय. जे चालक रिक्षात माहिती लावणार नाहीत त्यांना ५०० रूपये दंड होणार आहे. येत्या रविवारपर्यंत ही माहिती रिक्षात लावण्याचा इशारा ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त संदीप पालक यांनी दिलाय.  


दरम्यान, असे प्रकार रोखण्यासाठी ठाण्यातल्या रिक्षा संघटनांनीही आता एक टीम स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. अशा रिक्षा चालकांना शोधून काढून त्यांना वेसण घालण्यासाठी रिक्षा संघटनाही प्रवाशांना मदत करणार आहेत.