चर्चा तर होणारच! ठाण्यातल्या रिक्षावाल्यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असंही समर्थन
रिक्षावाला विरुद्ध मर्सिडीज! महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद
Maharashtra Shinde Government : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक रिक्षावाला चांगलाच गाजतो आहे. आणि त्याचं नाव आहे एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde). महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री. कधीकाळी पोटापाण्यासाठी ठाण्यात त्यांनी रिक्षा चालवली. राजकारणातही वाट पाहून पाहून शेवटी या रिक्षावाल्यानं सगळ्यांचीच पुरती वाट लावली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं तीन चाकी सरकार या रिक्षावाल्यानं उलटंपालटं करून टाकलं.
उद्धव ठाकरेंच्या सरकारला या रिक्षावाल्यानं ब्रेकच लावला नाही. तर ठाकरेंऐवजी ते स्वतःच मुख्यमंत्रीपदाच्या ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसले. रिक्षा चालवणारा हा सामान्य शिवसैनिक थेट राज्याचा मुख्यमंत्री झाला.
रिक्षावाल्यावरुन रंगला कलगीतुरा
आता याच रिक्षावाल्यावरून आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये कलगीतुरा रंगलाय. रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली होती. त्याला ब्रेक नव्हता, सुसाट सुटला होता. अपघात तर होणार नाही ना? असं टेन्शन सगळ्यांना आलं होतं. अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) एकनाथ शिंदेंवर जोरदार टोलेबाजी केली.
अर्थात एकनाथ शिंदेंनीही त्यावर जोरदार पलटवार केला. रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार!! असं ट्वीट एकनाथ शिंदेंनी केल्यानं रिक्षा विरुद्ध मर्सिडीज वादाला तोंड फुटलंय.
मुख्यमंत्र्यांना रिक्षाचालकांचा पाठिंबा
आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ ठाण्यातील रिक्षाचालकही सरसावले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्विकारल्या नंतर ठाण्यातील रिक्षा चालकांच्यावतीने त्यांचं अभिनंदन करण्यासाठी पालिका मुख्यालय इथं एक फलक उभारण्यात आला आहे..
'होय..आम्हाला अभिमान आहे..आमचा रिक्षा चालक मुख्यमंत्री झाला' असा मजकूर या फलकावर लिहिण्यात आला आहे. तसंच एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ रिक्षाची रॅली देखील काढण्यात येणार आहे.
ठाण्यातील रिक्षाचालकांनी टी-शर्टही बनवले आहेत. या टी-शर्टवर 'मी रिक्षावाला मी मुख्यमंत्री' असं छापण्यात आले असून हे टी-शर्ट घालून रिक्षा चालवत आहेत.