I Love U म्हण नाहीतर तुझे बॅनरच लावतो... रोड रोमिओची विवाहितेला धमकी
एकतर्फी प्रेमातून रोड रोमिओची भलतीच धमकी, संभाजीनगरमध्ये खबळबळ
विशाल करोळे, झी मीडिया, संभाजीनगर : एकतर्फी प्रेमातून विवाहितेला त्रास देण्यासाठी एका रोड रोमिओने त्या महिलेला दिलेल्या धमकीने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणाने त्या महिलेला चक्क तिच्या फोटोंचे बॅनर लावण्याची धमकी दिली. संभाजीनगरमधली (Sambhaji Nagar) ही घटना असून पीडित महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली असून धमकी देणाऱ्या तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोप तरुण फरार असू पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
काय आहे नेमकी घटना?
आरोपी तरुण हा पीडित महिलेच्याच परिसरात रहातो. पीडित महिलेशी जवळीक वाढवण्यासाठी आरोपी तरुणाने एक मार्ग शोधून काढला. तुझ्या नवऱ्याचे एका मुलीबरोबर प्रेम प्रकरण सुरु असून याचे सगळे पुरावे मी तुला देऊ शकतो असं सांगत त्याने पीडित महिलेशी मैत्री केली. हळूहळू दोघांमध्ये संवाद वाढू लागला. मैत्रीतच त्याने पीडित महिलेसोबत सेल्फी काढला, आणि इथेच ती महिला फसली.
ओळखीचा फायदा घेत तरुणाने पीडित महिलेला प्रेमाची कबुली दिली. पण तिच्या मनात असं काही नसल्यानं तीने आरोपी तरुणाबरोबर मैत्रीचं नातं तोडून टाकलं. यामुळे संतापलेल्या तरुणाने पीडित महिलेला त्रास द्यायला सुरुवात केली. मला I LOVE U म्हटलं नाहीस तर तुझ्या आणि माझ्या फोटोचा बॅनर बनवून ते परिसरात सगळीकडे लावेन, व्हॉट्सअॅप आणि फेसबूकवरही आपला फोटो शेअर करेन अशी धमकी तो पीडित महिलेला देऊ लागला.
या गोष्टींना वैतागलेल्या पीडित महिलेने त्या तरुणाचा फोन नंबर ब्लॉक केला. पण तो तरुण दुसऱ्या नंबरवरुन फोन करुन तिला त्रास देऊ लागला. पीडित महिला उत्तर देत नसल्याने तिला शिवीगाळ करण्यापर्यंत त्याची मजल गेली. सततच्या त्रासाला कंटाळून अखेर त्या महिलेने पोलिसात धाव घेत आरोपी तरुणाविरुद्ध तक्रार दाखल केली. त्या तक्रारीच्या आधारे क्रांती चौक पोलीस ठाण्यात त्या तरुणाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी तरुण फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.