...आणि म्हणून श्रमदानातून केली रस्त्यांची डागडुजी !
रस्त्यांची झालेली चाळण हा आपल्याकडील सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि पावसाळ्यात त्याचा त्रास अधिक होऊ लागतो.
मुंबई : रस्त्यांची झालेली चाळण हा आपल्याकडील सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि पावसाळ्यात त्याचा त्रास अधिक होऊ लागतो. अलिबाग-रेवदंडा रस्त्यावर पडलेल्या प्रचंड खड्डयांमुळे प्रवास करताना प्रवाशांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशा खड्डयांतून प्रवास केल्याने मानेचे, कमरेचे आजार उद्भवतात. तसेच वाहनांचे देखील नुकसान होते. हे लक्षात घेऊन अलिबाग रेवदंडा मार्गाची श्रमदानातून रस्ता दुरुस्ती करण्यात आली.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अलिबाग-रोहा रस्ता, कुरुळ आर.सी.एफ. वसाहत ते बेलकडे फाटा व सहाण-पाल्हे रस्त्यावर पडलेले खड्डे, साईडपट्टय़ा साफ करणे व रस्त्याकडेची नालेसफाई अशी सगळी कामे करण्यात आली.
अलिबाग, मुरुड हे पर्यटनासाठी प्रसिध्द आहे. परंतू रस्त्यावरील खड्डयांमुळे पर्यटकांनी येथे पाठ फिरवली आहे. त्यामुळे पर्यटनावर आधारित व्यावसायिकांच्या व्यवसायात अनेक अडचणी येऊ लागल्या. या अडचणींची दखल घेऊन डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी तसेच सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमदानातून रस्ते दुरुस्त करण्याबरोबरच ते देखील साफ करण्यात आले.