कोल्हापुरात कॅशियरवर रिव्हॉल्व्हर रोखून बॅंकेवर दरोडा
कोल्हापुरात सहकारी बँकेच्या शाखेत चोरट्यांनी पिस्तुलचा धाक दाखवून भरदुपारी दरोडा टाकला.
कोल्हापूर : आपटेनगर इथल्या यशवंत सहकारी बँकेच्या शाखेत चोरट्यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून भरदुपारी दरोडा टाकला. या बँक दरोड्याचे चित्रण सीसीटीव्हीत कैद झाले आहे. यामध्ये चोरट्यांनी कशा पद्धतीने बँकेतील अधिकाऱ्याला धमकावले हे स्पष्ट दिसत आहे. सीसीटीव्हीमध्ये या दोन चोरट्यांनी बँकेतील ६२ हजारांची रोकड लंपास केली आहे. याबाबत बॅकेचे कर्मचारी दर्शन दिलीप निगडे यांनी कोल्हापूर पोलीसात फिर्याद दिली आहे.
फुलेवाडी रिंगरोड परिसरात यशवंत सहकारी बँकेचे आपटेनगर इथे शाखा आहे. गुरुवारी दुपारी जेवणाची सुट्टी झाली, त्यावेळी शाखेत कॅशियर आणि शाखाधिकारी असे दोनच कर्मचारी होते. त्यातील शाखाधिकारी अशोक तोडकर हे जेवणासाठी बाहेर गेले. त्याचवेळी तोडांला कापड बांधलेली आणि हेल्मेट घातलेली व्यक्ती बँकेत आली. त्याचवेळी दोघांनी स्वत: जवळील रिव्हॉल्व्हर कॅशियरवर रोखली. या दोघांनी बँकेतील रक्कम घेऊन पोबारा केला, अशी माहिती करवीरचे पोलीस उपअधिक्षक डॉ. प्रशांत आमृतकर यांनी दिली.