Rohit Pawar On Pune Medical Officer Letter: पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लिहिलेल्या पत्रावर आता राजकीय प्रतिक्रिया उमट असतानाच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी थेट आरोग्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. साडेसहा हजार कोटी रुपयांच्या दलालीचा उल्लेख करत रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच थेट सवाल केला आहे.


नेमकं पत्र प्रकरण काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ प्रकरणी आणि विभागातंर्गत आर्थिक घोटाळ्याचा ठपका ठेवत राज्याच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाने पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांना निलंबित केलं आहे. निलंबित पवार यांची बदली नंदुरबारच्या जिल्हा रुग्णालयात करण्यात आली आहे. निलंबनाच्या कारवाईनंतर पवार यांनीएक पत्र लिहित खळबळजनक गौप्यस्फोट केले आहेत.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव आणि अप्पर मुख्य सचिव यांचा उल्लेख करत लिहिलेल्या पत्रामध्ये, 'मंत्री महोदयांनी मला कात्रज कार्यालयात बोलावून नियम बाह्य टेंडरची काम करण्यास सांगितली. त्यासोबतच इतर खरेदी प्रकरणात दबाव आणला. पण मी नियम बाह्य काम केली नाहीत म्हणून माझं निलंबन करण्यात आलं आहे,' असा आरोप  पवार यांनी केला आहे. 


"माझे निलंबन हे माझ्या विरुद्ध तक्रारीमध्ये तथ्य नसतानाही त्रास देण्याच्या हेतूने आणि माझे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी मा. मंत्री महोदय यांच्या दबावामुळे केलेले आहे, अशी माझी धारणा आहे. झालेल्या निलंबनामुळे माझे मनोधैर्य खचून गेले असून माझे कुटुंब मानसिक तणावामध्ये आहे. निलंबन करत असताना, माझ्या सध्याच्या कार्यात तक्रारी नसताना केवळ जुन्या तक्रारी शोधून काढून आणि माझे म्हणणे सादर करण्याची कोणतीही संधी न देता माझे निलंबन करुन माझ्यावर अन्याय झालेला आहे," असं पवार यांनी पत्रात म्हटलं आहे.



रोहित पवारांनी साधला निशाणा


"आरोग्य विभागात ॲम्बुलन्स खरेदीत साडेसहा हजार कोटी रुपयांची दलाली खाणाऱ्या भ्रष्टाचाराच्या 'खेकड्या'ने आता अधिकाऱ्यांनाही नांग्या मारण्यास सुरुवात केलीय," असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे. आपल्या एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन हे पत्र पोस्ट करताना रोहित पवारांनी, "नियमबाह्य टेंडरिंगला नकार दिल्यामुळे व्यवस्थेतील याच खेकड्याने निलंबित केल्याची तक्रार पुणे महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडं केलीय. नियम बाह्य टेंडरसाठी कात्रजच्या कार्यालयात बोलावून दबाव आणणारा हा मंत्री म्हणजे आरोग्यमंत्रीच आहे का?" असा सवाल उपस्थित करत आरोग्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.


"तसेच हा आरोग्यमंत्री असेल तर संपूर्ण आरोग्य खात्याला आपल्या पोखरणाऱ्या या मंत्र्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपण अजून किती दिवस पाठीशी घालणार? आरोग्य व्यवस्थेला लागलेली ही कीड काढण्यासाठी सर्जरी कधी करणार?" असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.




सदस्यांच्या समितीनंतर निलंबन


आरोग्य सेवा आयुक्तालयाने मात्र समितीच्या सल्ल्यानुसार निलंबन करण्यात आल्याचा दावा केला आहे. 29 एप्रिल रोजी 3 सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली होती. डॉक्टर पवार यांच्याविरुद्ध तक्रारीचे गंभीर स्वरूप पाहता निष्पक्ष चौकशी व्हावी या दृष्टीने डॉ. पवार यांना निलंबित करणे आवश्यक आहे, अशी शिफारस समितीने केलेली. त्यानुसार डॉ. भगवान पवार यांचं निलंबन करण्यात आल्याचा युक्तिवाद करण्यात आला आहे.