बीड : पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी अरूण राठोडला चौकशीसाठी पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय.  त्याच्या चौकशीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येतेय... कोण आहे हा अरुण राठोड? आणि पूजा मृत्यू प्रकरणात त्याची भूमिका एवढी महत्त्वाची का आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूजा चव्हाणशी अरुण राठोडचा काय संबंध?


टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या मृत्यूचा तपास करणाऱ्या पुणे पोलिसांना अखेर मोठा सुगावा हाती लागला आहे. तब्बल 10 दिवस गायब असलेल्या अरुण राठोडला  पुणे पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. 


कोण आहे अरुण राठोड?


- वानवडीतल्या ज्या घरात पूजाचा मृत्यू झाला, त्या घरात अरुण सुभाष राठोडही राहत होता.
- मृत्यूच्या रात्री पूजाच्या भावासोबत अरुणही फ्लॅटवरच उपस्थित होता.
- अरुण राठोड हा मूळचा बीडचा... परळी येथील दारावती तांडा गावचा रहिवाशी...
- वनमंत्री संजय राठोड यांचा तो निकटवर्तीय असल्याचं सांगितलं जातं.
- राठोड यांच्या कृपेनं तो महाराष्ट्र बांबू विकास महामंडळात कार्यक्रम समन्वयक म्हणून नोकरीला लागला होता, अशी चर्चा आहे.


उल्लेखनीय बाब म्हणजे यवतमाळ जिल्हा रुग्णालयात पूजा अरुण राठोड नावाच्या तरुणीचा गर्भपात करण्यात आल्याची नोंद आहे. त्यामुळं अरुण राठोडच्या भोवती संशयाचं धुकं आणखी वाढलं. याप्रकरणी अरुण राठोडची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी आता पुढं येतंय. तर पूजाच्या मृत्यूबाबत तिच्या कुटुंबीयांकडूनही दररोज नवनवे दावे केले जात आहेत.


पूजावर कर्जाचा डोंगर?


पोल्ट्री व्यवसायातल्या नुकसानीमुळं पूजानं आत्महत्या केली असावी, अशी माहिती पूजाच्या वडिलांनी आधी दिली होती. आता ती सोरायसीस आजारानं त्रस्त होती आणि पूजाची डॉक्टरांकडे ट्रिटमेंट सुरू होती. गोळ्या सुरू असल्यानं ती चक्कर येऊन खाली पडली असावी, असा जबाब आता पूजाच्या आईवडिलांनी पोलिसांना दिलाय. त्यामुळं या प्रकरणातलं गूढ वाढतच चाललंय. 


अरुण राठोडच्या चौकशीत नेमकी काय माहिती हाती येते, यावर पोलीस तपासाची पुढची दिशा ठरणाराय... त्यानंतरच पूजाच्या मृत्यूचं गूढ उकलण्याची शक्यता आहे.