Rs 2000 Note Ban: 2 हजारांच्या नोटबंदीवरुन राज ठाकरेंची टीका! फडणवीस म्हणाले, `...तर नक्कीच त्रास होणार कारण..`
Devendra Fadnavis On Rs 2000 Note Ban: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदी सरकारच्या या निर्णयावर टिका करताना निर्णय चुकीचा असल्याचं म्हटलं तर राष्ट्रवादीनेही या निर्णयाविरुद्ध आरबीआयसमोर आंदोलन केलं. याच पार्श्वभूमीवर फडणवीस यांना विचारण्यात आला प्रश्न.
Devendra Fadnavis On Rs 2000 Note Ban: देशातील केंद्रीय बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 19 मे रोजी जारी केलेल्या नोटीसमध्ये 2 हजार रुपयांच्या नोटा (Rs 2000 Note Ban) चलनामधून काढल्या जाणार असल्याची घोषणा केली. सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत या नोटा बदलून घेण्याचं आवाहन भारतीयांना करण्यात आलं आहे. याच 2 हजारांच्या नोटबंदीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाले असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनीही (Raj Thackeray) केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या धोरणांवर (Modi Government) टीका केली आहे. 2 हजारच्या नोटबंदीचा निर्णय चुकीचा असल्याचं राज यांनी म्हटलं आहे. मात्र या टिकेला आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तर दिलं आहे. शनिवारी हिंगणामधील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीसांनी 2 हजारांची नोट चलनामधून काढून घेण्यासंदर्भातील टिकेला उत्तर दिलं.
राज काय म्हणाले?
2 हजार रुपयांची नोट चलनातून काढून घेण्यासंदर्भात राज ठाकरेंना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला असता हा निर्णय चुकीचा असल्याचं ते म्हणाले. "त्यावेळी (2016 च्या नोटबंदीच्या वेळी) मी एक भाषण केलं. हा धरसोडपणा आहे. तज्ज्ञांना विचारुन या गोष्टी झाल्या असत्या तर ही वेळ आली नसती. कधी नोट आणायची, कधी बंद करायची. ज्यावेळेला त्या नोटा आणल्या त्या एटीएम मशीनमध्येही जात नव्हत्या. त्या एटीएम मशीनमध्ये जातात की नाही हे ही पाहिलं नव्हतं. असले निर्णय देशाला परवडणारे नसतात. आता लोकांना पुन्हा बँकांमध्ये पैसे टाकायचे. परत उद्या तुम्ही नवीन नोट आणणार. हे असं काय सरकार चालतं का? असे थोडी प्रयोग होतात," असं राज ठाकरे म्हणाले.
नोटबंदी फसली का?
तसेच पत्रकारांनी, नोटबंदी फसली असं म्हणायचं का? असा प्रश्न राज यांना विचारला. त्यावर राज यांनी, "मी तेव्हाच बोललो होतो यावर. तुम्ही जे मला प्रश्न विचारता ते सरकारमधील लोकं येतात तेव्हा चैन लावलेली असते का तोंडावर? तुम्हाला कोणी पाठवलेलं असतं का हे विचारा म्हणून," असा प्रतिप्रश्न पत्रकारांना केला.
फडणवीसांनी दिलं उत्तर...
2 हजारांची नोट बंद केली आहे. राष्ट्रवादीने रिझर्व्ह बँक समोर आंदोलन केलं. राज ठाकरेंनी सुद्धा हा चुकीचा निर्णय आहे असं म्हटलं आहे, असं म्हणत फडणवीस यांना हिंगणामध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना फडणवीस यांनी, "2 हजारची नोट ही सर्क्युलेशनमधून बाहेर काढायचा निर्णय झालाय. त्याला काही बेकायदेशीर ठरवलेलं नाही. ऑक्टोबरपर्यंत ही नोट सर्क्युलेशनमधून बाहेर काढायची आहे. त्यामुळे ऑक्टोबरपर्यंत या नोटा तुम्हाला बदलता येतील. ज्यांच्याकडे कायदेशीर नोटा असतील. पांढरा पैसा असेल त्यांना चिंता करण्याची गरज नाही. कोणी काळा पैसा जमा केला असेल तर नक्कीच त्रास होणार कारण त्याला सांगावं लागणार आहे की इतक्या नोटा आल्या कुठून" असं म्हटलं.
ज्यांनी नोटा जमा करुन ठेवल्या असतील त्यांना
तसेच पुढे बोलताना फडणवीस यांनी, "सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की 2 हजारच्या नोटा किंवा कुठल्याही नोटा बदलल्यानंतरचा सर्वात मोठा फायदा जो आपल्याला मागच्या नोटबंदीच्या वेळेस लक्षात आला की नकली चलन आपल्या देशात ढकलण्याचा प्रयत्न आयएसआयसारख्या (पाकिस्तानी गुप्तचर संघटना) संघटनांकडून होतो तो प्रयत्न यातून उधळला जातो. मागील काळात जे इनपुट्स मिळाले त्यानुसार आपण यावर बंधनं घालू शकलो. या निर्णयामुळे नकली चलन बाजारात आणण्याच्या गोष्टीवर आळा बसेल आणि दुसरीकडे ज्यांनी नोटा जमा करुन ठेवल्या असतील त्यांना हे सांगावं लागेल की नोटा आल्या कुठून," असंही म्हटलं.
रिझर्व्ह बँकेने 2 हजारांची नोट चलनातून बाहेर काढलेली नसून हे कायदेशीर चलन म्हणून कायम राहणार आहे असं सांगितलं असलं तरी अनेक ठिकाणी आता 2 हजारांची नोट स्वीकारण्यास व्यापारी स्पष्टपणे नकार देत आहेत.