चाळीत राहणाऱ्याला 382 कोटींची Income Tax Notice; 1 चूक पडली महागात; आधार आणि PAN...
Rs 382 crore Income tax Notice To Diva Man: ठाण्यामधील दिवा येथील एका चाळीतील छोट्याश्या खोलीत राहणाऱ्या व्यक्तीकडे आयकर विभागाने चक्क 382 कोटींची हिशोब मागितला अन् या व्यक्तीला धक्काच बसला.
Rs 382 crore Income tax Notice To Diva Man: ठाण्यामधील दिव्यातील एका चाळीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला आयकर विभागाची नोटीस आल्याने धक्काच बसला. विशेष म्हणजे आलेली ही नोटीस काही हजार किंवा लाखांची नाही तर तब्बल 328 कोटींची असल्याची समजल्यानंतर या व्यक्तीच्या पायाखालील जमीनच सरकली. आर्थिक घोटाळ्यामध्ये आपलं नाव गोवण्यात आल्याचं या व्यक्तीच्या लक्षात आलं आणि त्याने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. ही व्यक्ती दिव्यामधील एक प्रॉपर्टी एजंट आहे. या व्यक्तीच्या नावे असणारी कागदपत्रं वापरुन खोट्या कंपन्या तयार करण्यात आल्या आणि त्या कंपन्यांच्या माध्यमातून हवाला रॅकेटमधून पैसे वळवण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्याचं वृत्त 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलं आहे.
नेमकी फसवणूक केली कशी?
हा सारा प्रकार 2022 सालातील एका घटनेनं सुरु झाल्याचं आता समोर आलं आहे. ज्या व्यक्तीला ही नोटीस आली तो नोकरीच्या शोधात होता. त्यासाठी या व्यक्तीने आरोपीला स्वत:चे आधारकार्ड, पॅन कार्ड, फोटो आणि एक धनादेश दिला होता. महिन्याला 20 हजार पगार असेल असं या व्यक्तीला सांगण्यात आलं. मात्र नोकरी देण्याच्या नावाखाली घेतलेल्या या कागदपत्रांचा वापर या व्यक्तीने आणि त्याच्यासोबतच्या दोन साथीदारांनी बँक खाती सुरु करण्यासाठी केला. या बँक खात्यांच्या आधारे या तिघांनी खोट्या कंपन्या सुरु केल्या. यामध्ये त्यांनी एक कंपनी स्वत: सुरु केल्याचं दाखवलं. मग याच कंपन्यांमधील व्यवहार दाखवत या तिघांनी हवालाच्या माध्यमातून सदर बँक खात्यांवरुन 382 कोटींचा फेरफार केला.
कसा झाला खुलासा?
आयकर विभागाने ठराविक बँक खात्यावर मोठ्या प्रमाणात कोट्यवधींचे व्यवहार होत असल्याने ज्या व्यक्तीच्या नावाने अकाऊंट आहे त्याला नोटीस पाठवली. त्यामुळे आपल्या नावाने असलेली कागदपत्रं वापरुन असा काही घोळ घालण्यात आल्याची पुसटशीही कल्पना नसलेल्या व्यक्तीला, 'तुमच्या नावाने झालेल्या 382 कोटींच्या व्यवहारांचं स्पष्टीकरण द्या' असं आयकर विभागाने सांगितलं. हा प्रकार समोर आल्यानंतर पीडित व्यक्तीने सायबर गुन्हे शाखेकडे धाव घेतली. या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करुन तपास सुरु करण्यात आला आहे.
पोलिसांनी काय सांगितलं?
तक्रारदार व्यक्तीच्या नावाने असलेली कागदपत्रं वापरुन आरोपीने हा घोटाळा केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. बेकायदेशीर आर्थिक व्यवहार करण्यासाठी खोट्या कंपन्या तयार करण्यात आला. "त्यांनी अनेक ठिकाणी ही कागदपत्रं वापरुन वेगवेगळी बँक खाती सुरु केली. त्यांनी या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची देवाण-घेवाण केली," असं पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं.
तुम्ही करु नका ही चूक; पोलिसांचं आवाहन
आपली खासगी माहिती तसेच आधार कार्ड, पॅन कार्डसारखी महत्त्वाची कागदपत्रं अशाप्रकारे कोणाबरोबर शेअर करु नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. अनेकदा ही अशी कागदपत्रं फसवणुकीसाठी वापरली जाण्याची शक्यता असते.