RSS Chief Mohan Bhagvat Nagpur Speech: पंथ-संप्रदायातून निर्माण झालेल्या कट्टरता, अहंता आणि धर्मांधतेला आज जगाला तोंड द्यावे लागत असल्याचे सरसंघचालक मोहन भागवक म्हणाले. नागपुरात विजयादशमीनिमित्त त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना विविध विषयांवर भाष्य केले. स्वार्थ आणि लालसेतून उद्भवलेल्या युक्रेन किंवा गाझा पट्टी येथील युद्ध वा तदृश तंट्यांची सोडवणूक दृष्टीपथात दिसत नाही. निसर्गाशी विसंगत जीवनशैली, स्वैराचार आणि भोगवादातून नवे नवे मनोविकार आणि शरीरव्याधी उत्पन्न होत आहेत. विकृती आणि अपराध वाढताना दिसताहेत. आत्यंतिक व्यक्तिवादामुळे कुटुंबे मोडून पडताना दिसत असल्याचे ते यावेळी म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निसर्गाच्या अमर्याद शोषणामुळे प्रदूषण, जागतिक तापमानवृद्धी, असंतुलित ऋतुमान अशा आपत्ती प्रतिवर्षी वाढताना दिसत आहेत. आतंकवाद, शोषण आणि सत्ताकांक्षा यांना मोकळं रान मिळालं आहे. आजचे जग संकुचित विचारांच्या आधारे ह्या साऱ्या समस्यांवर मात करू शकणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. परिणामत: आपली सनातन जीवनमूल्ये आणि संस्कारव्यवस्था यांच्या आधारे भारतानेच आपल्या उदाहरणातून जगाला शाश्वत सुखशांतीचा नवा मार्ग दाखवावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. 


देशात आपल्या राजकीय स्वार्थासाठी प्रतिस्पर्ध्याला पराभूत करण्याच्या हेतूने अशा अनिष्ट शक्तींशी युती करण्याचा अविवेक केला जात आहे. समाज आधीच आत्मविस्मृत होऊन विविध प्रकारच्या भेदांनी ग्रासलेला आणि स्वार्थ, मत्सर अन् द्वेषाच्या जीवघेण्या स्पर्धेत अडकलेला आहे. त्यामुळेच या राक्षसी शक्तींना समाज किंवा राष्ट्र तोडू पाहणाऱ्या अंतर्गत किंवा बाह्य शक्तींचाही सहज पाठिंबा मिळतो, असे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. 


मणिपूरची सद्यस्थिती पाहिली तर ही गोष्ट लगेच लक्षात येते. जवळपास दशकभर शांतता प्रस्थापित असलेल्या मणिपूरमध्ये हा परस्पर कलह अचानक कसा उफाळून आला? हिंसाचार करणाऱ्यांमध्ये सीमेपलीकडील अतिरेकीही होते का? आपल्या अस्तित्वाच्या भवितव्याबाबत धास्तावलेल्या मणिपुरी मैतेई समाज आणि कुकी समाजाच्या या परस्पर संघर्षाला जातीय वा धार्मिक स्वरूप देण्याचा हा प्रयत्न का आणि कोणाकडून करण्यात आला? गेल्या 9 वर्षांपासून सुरू असलेली शांतता कायम ठेवण्याचे काम राज्य सरकार करत असतानाही हा हिंसाचार का सुरू झाला आणि कोणी सुरु केला ? आजच्या परिस्थितीत, संघर्षाच्या दोन्ही बाजूंचे लोक शांतता शोधत असताना, त्या दिशेने कोणतेही सकारात्मक पाऊल उचलताना दिसताच दुर्घटना घडवून पुन्हा द्वेष आणि हिंसाचाराला चिथावणी देणाऱ्या कोणत्या शक्ती कार्यरत आहेत? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. 


ही दुर्दैवी परिस्थिती,समस्या सोडवण्यासाठी बहुआयामी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती, अनुरूप सक्रियता आणि कार्यक्षमता ही काळाची गरज असतानाच, समाजातील प्रबोधनशील नेतृत्वालाही परस्परांमधील अविश्वासाची दरी भरून काढण्यासाठी विशेष भूमिका बजावावी लागेल, असे आवाहन त्यांनी केले. 


कोणीही कितीही चिथावणी दिली तरी प्रत्येक परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करीत, नागरी शिस्त पाळून, आपल्या घटनेने दिलेल्या संकेतांनुसार आचरण अनिवार्यपणे करायला हवे. स्वतंत्र देशात ही अशी वागणूकच देशभक्तीची अभिव्यक्ती मानली जाते. प्रसारमाध्यमांतून होणारा चिथावणी देणारा भडकाऊ अपप्रचार आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांच्या स्पर्धेत आपण अडकू नये. प्रसारमाध्यमांचा उपयोग समाजात सत्य आणि आत्मीयता पसरवण्यासाठी व्हायला हवा. सुसंघटित सामर्थ्यसंपन्न समाजाने कायदा आणि सुव्यवस्थेच्या रक्षणासाठी घेतलेला पुढाकार आणि सरकार, प्रशासनाला केलेले योग्य सहकार्य हाच हिंसाचार आणि गुंडगिरीवर मात करण्याचा योग्य उपाय असल्याचे ते म्हणाले. 


संपूर्ण जगाला एकाच रंगात रंगविण्याचा किंवा एकरूपता साधण्याचा कोणताही प्रयत्न आजवर यशस्वी झाला नाही आणि भविष्यातही यशस्वी होणार नाही. भारताच्या स्व'स्वरूपाची ओळख आणि हिंदू समाजाची अस्मिता टिकवून ठेवण्याचा विचार स्वाभाविकच आहे. आजच्या जगाच्या समकालीन गरजांची पूर्तता करण्यासाठी, काळाशी सुसंगत, स्वतःच्या मूल्यांच्या आधारे भारताने नवे रूप घेऊन उभे राहावे, ही जगाचीही अपेक्षा असल्याचे त्यांनी यावेळ म्हटले.