चिपळूणमध्ये उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि निलेश राणे यांचे समर्थक भिडले आहेत. दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरेंची सिंधुदूर्ग जिल्ह्यात सभा पार पडली होती. या सभेत भास्कर जाधव यांनी राणे कुटुंबावर जहरी टीका केली होती. निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांच्या टीकेला उत्तर देत आव्हानही दिलं होतं. गुहागरमध्ये येऊन मी जशास तसं उत्तर देईन असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार आज निलेश राणे यांची सभा आज आयोजित होती. या सभेला ते जात असतानाच हा राडा झाला आहे. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न आहे. तसंच वाहतूक विस्कळीत झाली असून तीदेखील सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. 


भास्कर जाधव यांनी या राड्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, "आज भाजपाचे सरचिटणीस निलेश राणे आज गुहागरमध्ये, माझ्या मतदारसंघात सभा घेण्यासाठी येत असल्याची मोठी जाहिरातबाजी करण्यात आली होती. त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात टीझर व्हायरल करुन लोकांना उचवण्याचा प्रयत्न केला होता. माझ्या कार्यालयासमोर मोठे बॅनर लावत गुन्ह्याला माफी नाही, हिशोब चुकता करणार अशा आव्हानात्मक घोषणा देण्यात आल्या होत्या. पण कोणाच्याही झेंड्याला, बॅनरला हात लावायची नाही अशी चिपळूण जिल्ह्याची संस्कृती नाही". 


पुढे ते म्हणाले की, "सभा गुहागरला असताना निलेश राणे मुंबईतून आले. त्यांनी दापोलीमार्ग फेरी बोटीने थेट गुहागरला जावं अशी अपेक्षा होती. पण ते जाणीवपूर्वक चिपळूणला आले. माझ्या घर, कार्यालयासमोर जाणीवपूर्वक आपला सत्कार करुन घेण्याचा प्लान केला. मी पोलिसांनी यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेण्यास सांगितलं होतं. त्याप्रमाणे ते विश्रांतीगृहावर गेले. पारनाक्यावर सत्कार करण्याचं ठरवलं होतं. ती जागाही जाणीवपूर्वक निवडली होती. पण 3.30 ते 5 वाजेपर्यंत रस्त्यावर बाहेर आलेच नाहीत. तसंच स्वागतासाठी लावण्यात आलेली क्रेन नाक्यावर होती. ती ऑफिसच्या बाजूला आणण्याचा प्रयत्न केला. मी पोलिसांना क्रेन पुढे आणू नका अशी विनंती केली होती. गुहागरमध्ये माणसंच सभेला नसल्याने ते पोलीस पुढे जाऊ देत नाही कारण सांगून मागे फिरतील असं वाटलं. यानंतर मी सर्वांना घरी जाण्यास सांगितलं. पण त्याचवेळी त्यांनी सत्कार केला आणि फटाके बजावले. ते रस्त्यावरुन मुद्दामून चालत, नाच गाणी करत पुढे आले. हात दाखवत उचकावण्याचा प्रयत्न केला. पण मी शांत राहण्यास सांगितलं होतं.  त्याचवेळी पलीक़डून दगडफेक सुरु झाली. यानंतर येथूनही दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी त्यांना मिरवणूक काढू द्यायला नको होती. त्यांनी परिस्थिती नीट हाताळायला हवी होती".


पोलिसांनी एकतर्फी कारवाई केली असून आमच्यावर लाठीचार्ज आणि अश्रूधुरांचा वापर केला असा आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे. कित्येक वर्षं राणे कुटुंब चिपळूणची शांतता भंग करण्याचा प्रयत्न सुरु असून आज तो पूर्णत्वास नेला असाही आरोप त्यांनी केला.