पुणे : मनसेच्या यापूर्वीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. प्रवेशाच्या भाषणात रुपाली पाटील यांनी आपण मनसे सोडून राष्ट्रवादी हाच पक्ष का निवडला हे सांगितलं आहे. रुपाली पाटील म्हणाल्या, मनसेची पदाधिकारी म्हणून काम करत असताना, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा होत होती, अजितदादा यांच्याकडे दिलेली कामं, जरी मी मनसेची असेल तरी सुद्धा जी कामं कायद्याच्या चौकटीत बसत असतील, ती बिनदिक्कत त्यांच्याकडून करुन दिली जात होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक नेते म्हणून अजितदादा सर्वसामान्यांची कामं करताना तेव्हापासून भावत होते, राष्ट्रवादी पक्षातील दादांचा काम करण्याचा धडाका पाहून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहे, असं रुपाली पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताना म्हटलं आहे. 


तसेच मी यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजितदादा यांना शब्द देते की, आमच्यासह बहुसंख्य महिला या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील यासाठी मोठा मेळावा घ्यावा लागेल. पक्ष प्रवेशाचा निर्णय रात्री उशीरा झाल्याने माझ्यासोबत जेवढ्या प्रमाणात सहकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करायला हवा होता, त्यांनी प्रवेश केला नाही.